धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:38 PM2019-06-02T23:38:45+5:302019-06-02T23:39:28+5:30
नऊ धानाच्या वाणांचे संशोधन करून जगभरात नावलौकिक मिळविलेले कृषीभूषण तथा एच.एम.टी. धानाचे संशोधक स्व. दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड या त्यांच्या गावी सोमवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी : नऊ धानाच्या वाणांचे संशोधन करून जगभरात नावलौकिक मिळविलेले कृषीभूषण तथा एच.एम.टी. धानाचे संशोधक स्व. दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड या त्यांच्या गावी सोमवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागभीड तालुक्यातील लहानश्या खेड्यात दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी आर्थिक परीस्थितीवर मात करून धानाच्या विविध जाती शोधून काढल्या. त्यात एच. एम.टी. नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, विजय, नांदेड, दीपक रत्न अशा प्रकारच्या अनेक प्रजातीचे वाण शोधून काढले. परंतु एच.एम.टी. धान बारिक वाण असल्यामुळे त्याची जगभर प्रसिध्दी करण्यात यश आले. सुनेला मिळालेल्या २.५ एकर जमिनीतून विविध प्रकारच्या धानाचे वाण शोधून प्रथम विदर्भात त्यानंतर हळुहळू जगभरात त्यांच्या वाणाचे संशोधन झाले. अशा संशोधक शेतकऱ्याला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पुरस्कृत केले. स्व. दादाजी खोब्रागडे यांना कृषीभूषण पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. तसेच फोर्ब्स या जगात प्रसिध्द असलेल्या पुस्तकात जगभरातील ग्रामीण उद्योगांच्या यादीत त्यांचा समावेश झाला. जागतिक पातळीवर त्यांनी देशाचे नावलौकिक केले.
कृषी क्षेत्रात भरीव काम करून जगाला दखल घेण्यास प्रेरित करणारा कृषीभुषण दादाजी खोब्रागडे यांचे मागील वर्षी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले होते. दादाजींच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी कुटुंबीयांतर्फे नांदेड या त्यांच्या गावी स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.