अत्याचाराचा गडचांदुरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:02 PM2018-04-20T23:02:06+5:302018-04-20T23:02:40+5:30
कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने मार्चमध्ये सहभागी झाले होते. शिवाजी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून, बसस्थानक महात्मा फुले चौक ते गांधी चौकापर्यंत मार्च काढण्यात आला होता.
यावेळी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे, विट्ठल थीपे, नगरसेवक नीलेश ताजने, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, नासिर खान, के.के. श्रीवास्तव, बल्लारपूर येथील थूल, पवन भगत, शेख हाफिज भाई, शरद जोगी, सागर ठाकूरवार, सुरेखा गोरे, शांता मोतेवाड, विक्रम येरणे, प्रा. अशोक डोईफोडे, शशांक नामेवार, सिद्धार्थ गोसावी, कय्युम खान, उद्धव पुरी, बंडू वैरागडे, मुमताज अली, राजू कादरी, अनिस कुरेशी, आसिफ लांबा, शेख अहेमद, शेख सिराज, नसरुद्दीन शेख, शेख अजिम आदी मान्यवर उपस्थित होते.
गांधी चौकात घेण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन रफिक शेख, प्रास्तविक प्रा. आशिष देरकर यांनी केले. देशात महिलांवर अत्याचार वाढत असल्याने उपस्थितांनी सरकारचा कठोर शब्दात निषेध केली. यावेळी ठाणेदार विनोद रोकडे यांना राष्ट्रपतीच्या नावाने निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व जाती-धर्माचे नागरिक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
उन्नाव, कठुआ घटनेविरुद्ध कॅन्डल मार्च
वरोरा : देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या कठुआ व उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेटी बचाओ समिती तसेच शहरातील सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला सुरक्षेबाबतीत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोपही यावेळी करण्यात केला. जम्मू काश्मीरच्या कठुआ येथील चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील मुलीवरील बलात्कार झाला. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ शहरात वेगवेगळ्या भागात कँडल मार्च काढण्यात आले. हातात मेणबत्ती व निषेधाचे फलक घेऊन शहरातील सर्वधर्मीय नागरिक मार्चमध्ये सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रगीताने कॅण्डल मार्चचा समारोप करण्यात आला.