कोठारी येथे कडकडीत बंद, नवरगावात निषेध रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:30 AM2018-01-05T00:30:23+5:302018-01-05T00:30:47+5:30
कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी/नवरगाव : कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली. कोठारीत तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आले. मुख्य रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. याप्रकरणी ३० ते ३५ आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
कोठारी येथे दुपारी १२ वाजता बुद्ध विहाराजवळून मोर्चाची सुरूवात झाली. बस स्थानक परिसरात मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी बल्लारपूर-गोंडपिपरी रस्ता दोन तास अडवून धरला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. यावेळी दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले. राजकुमार परेकर, भारिप बंमस महासचिव धिरज बांबोळे, बसपा महासचिव वेणुदास खोब्रागडे, रिपाई (आ) शैलेश रामटेके, काँग्रेसचे विनोद बुटले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.
नवरगावात निषेध सभा
नवरगाव : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ नवरगाव येथे गुरुवारी रॅली काढुन निषेध सभा घेण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास येथील बुद्ध विहारापासून सुरूवात झाली. अहिल्याबाई होळकर चौक, आझाद चौक, गुरुदेव चौक, दुकान चौक मार्ग गुजरी चौकात रॅली पोहचली. त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. विविध पक्षाच्या सामाजिक संघटनानी यावेळी मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये बौद्ध बांधव शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा दगडा बंदोबस्त होता.
८० जण सुखरूप परतले
माजरी : कोरेगाव भीमा येथील महोत्सवात सहभागी होण्यासाठी माजरी येथील ८० जण आपल्या परिवारासह दोन ट्रॅव्हल्समध्ये गेले होते. ते सर्व जण सुखरूप परतले आहेत. परंतु, कोरेगाव भीमामध्ये घडलेल्या घटनेमुळे त्यांना महोत्सवात सहभागी होता आले नाही. दगळफेक व जाळपोळनंतर तिथे कुणालाही जाऊ दिले नाही. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लहान मुलांना कोणताही दुखापत होऊ नये म्हणून आम्ही सर्व जण परत आलो, अशी माहिती आंबेडकर चळवळीचे राजेंद्रप्रसाद गेडाम, मुकुंद वासनिक, भीष्मा वालदे, मिलिंद रामटेके, गुरुदास भगत आणि महादेव दुपारे यांनी दिली.