मान्यतेशिवाय निधी खर्च करण्यास मनाई
By admin | Published: July 10, 2016 12:42 AM2016-07-10T00:42:42+5:302016-07-10T00:42:42+5:30
विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेऊनच कामे करणे बंधनकारक आहे. अशी मान्यता न घेता कामे केल्यास ...
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा : जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा
चंद्रपूर : विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेऊनच कामे करणे बंधनकारक आहे. अशी मान्यता न घेता कामे केल्यास ती अनियमितता मानली जाईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी वजावले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, सांसद आदर्शग्राम तसेच जिल्हा नाविण्यता परिषदेअंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सलील बोलत होते.
बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपवनसंरक्षक गिरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, बांधकामचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता गजबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, एकात्मिक आदिवासी कल्याण प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, विविध शासकीय विभागांना विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या वतीने निधी उपलब्ध करुन दिला जात असतो. हा निधी योग्य बाबीवर वेळेत खर्च होणे आवश्यक आहे. वार्षिक योजनेतून या विभागांना निधी वितरित करण्यात आला आहे. त्यांनी घेण्यात आलेल्या कामांना गती द्यावी. प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. सर्वसामान्यांना अधिक दिलासा देणारी तसेच जोडधंदा उपलब्ध करुन देणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही सलील यांनी दिले. तालुक्याच्या ठिकाणी ईको टुरिझम पार्क घेण्यासोबतच रेशिम, मधमाशा पालन यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास वार्षिक योजनेतून वाढीव निधी उपलब्ध केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय कामकाज करतांना पत्रव्यवहारात फार वेळ जातो. त्यामुळे कामे पाहिजे त्या गतीने होत नाही. ही बाब निदर्शनास घेता सर्व प्रकारचे पत्र व्यवहार व सुचना तथा मार्गदर्शनासाठी अधिका-यांनी व्हॉट्सअपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सलील यांनी दिले. (नगर प्रतिनिधी)
चंदनखेडा सांसद आदर्शग्रामचा आढावा
केंद्रीय मंत्री तथा चंद्रपूरचे खा. हंसराज अहीर यांच्या ‘चंदनखेडा’ या सांसद आदर्शग्रामचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. या गावासाठी नियोजित आराखडयाप्रमाणे प्रस्तावित केलेली कामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व उपस्थित विभागप्रमुख अधिकाऱ्यांना दिले. विभागनिहाय कामांच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.