प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू
By admin | Published: February 5, 2017 12:31 AM2017-02-05T00:31:57+5:302017-02-05T00:31:57+5:30
सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भडांगपूर, माथरा, सुबई, चिंचोली, साखरी येथील प्रकल्पग्रस्तांची तळमळ जाणून घेऊन ...
उपोषणकर्त्यात संताप : पालकमंत्र्यांच्या पत्रालाही केराची टोपली
राजुरा : सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भडांगपूर, माथरा, सुबई, चिंचोली, साखरी येथील प्रकल्पग्रस्तांची तळमळ जाणून घेऊन त्याच्या समस्या त्वरित निकाली काढण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिचे चेअरमन यांना पत्र पाठविले. या पत्राला वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून अजूनपर्यंत एकही समस्या निकाली काढली नाही. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला असून मागील तीन दिवसांपासून शेकडो शेतकरी उपोषण करीत आहे.
शेतकरी विलास घटेल बाळू जुलमे, राजू मोहारे, बालाजी पिंपळकर, रविंद्र बोबडे, सोनु गाडगे यांनी अन्न व पाणी त्याग उपोषण सुरू केले असून यापैकी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. आज ५८ वर्षीय महिला पुष्पा बुधवारे आणि मुर्लीधर फटाले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ शेकडो शेतकरी उपोषण मंडपात होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजू मोहारे, मनिषा पायधन, मालू पिंपळकर, मनिषा बोबडे, अर्चन मोहारे, विजया कुबडे यांनी दिला आहे.
उपमहाप्रबंधकाची उपोषण मंडपाला भेट
बल्लारपूर क्षेत्राचे उपमहाप्रबंधक एम.येलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले, तहसिलदार धर्मेष फुसाटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, जगन्नाथ चन्ने यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करून निर्णय घेणाऱ्या वेकोलिच्या अधिकाऱ्यांना नागपूरवरुन उपोषणस्थळी बोलविण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात दिले. प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच असून अनेक समर्थक त्यांच्या उपोषण मंडपात शनिवारी बसले. (शहर प्रतिनिधी)