एकोना कोळसा खाणविरोधात प्रकल्पग्रस्तांचे मुंडण; मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 03:59 PM2022-11-25T15:59:30+5:302022-11-25T16:03:11+5:30
समस्यांमुळे गावकरी हैराण
चंद्रपूर : एकोना कोळसा खाणीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले. परंतु, खाण व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी गुरुवारपासून आंदोलन सुरू केले. पहिल्या दिवशी काहींनी मुंडण करून कंपनीचा निषेध नोंदविला.
माढेळी ते वरोरा व नागरी ते माढेळी रस्त्याची दुरुस्ती करावी. ॲम्ब्युलन्स, अग्निशामक, गावात जाणारे सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, पथदिवे, बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यावी. सीएसआर फंड निधीअंतर्गत गावाचा विकास करावा. ग्रामपंचायत एकोना व लगतच्या गावांना खनिज निधी उपलब्ध करून द्यावा. खाणीतील विस्फोटाने गावातील घरांना भेगा पडल्या. स्थानिकांना नागरिकांना रोजगार द्यावा, आदी मागण्या समितीने केल्या. एकोना कोयला खदान संघर्ष समितीमार्फत आंदोलन सुरू करण्यात आले.
आंदोलनात एकोना कोयला खदान संघर्ष समिती अध्यक्ष सरपंच गणेश चवले, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे, ॲड. अनिल ठाकरे, सुनंदा जीवतोडे, अरुणा खंडाळकर, नरेंद्र ठाकरे, सरपंच देवानंद महाजन, साहेबराव ठाकरे, बाळू भोयर, सरपंच चंद्रकला वनशिंगे, सरपंच योगिता पिंपळशेंडे, सरपंच शालू उताणे, सचिन बुरडकर उपसरपंच, सरपंच मंगला लेवादे, सरपंच निर्मला दडमल, सरपंच जयश्री चौधरी व चरूर, एकोना, वनोजा, पांझुरणी येथील नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
२७ ग्रामपंचायतींचा सहभाग
माजरी क्षेत्राअंतर्गत असलेल्या वेकोलितर्फे २०१६ मध्ये एकोना खुली खाण सुरू झाली. एकोना, वनोजा, चरूरखडी, मारडा येथील जमिनी संपादित केल्या. कंपनीने अल्प भरपाई दिली. जनसुनावणीनुसार वचन पाळले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी २४ नोव्हेंबरला वरोरा तालुका व मारेगाव तालुका मिळून २७ ग्रामपंचायत सरपंचांनी कंपनीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
आंदोलनावर ठाम
वेकोली एरिया मॅनेजर गौतम रॉय व अन्य अधिकारी आज आंदोलनस्थळी दाखल झाले. प्रकल्पग्रस्तांचे निवेदन स्वीकारले. तीन दिवसांच्या आत मागण्यांवर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे.