‘अच्छे दिन’ चे आश्वासन हवेत विरले; बल्लारपुरात शिवराज्य यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:34 PM2019-09-10T15:34:59+5:302019-09-10T15:35:47+5:30
भाजप सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’ चे आश्वासन हवेत विरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बेरोजगारीत वाढ होत असून दबावतंत्राने हुकूमशाही सुरू झाली आहे. चुकीच्या नियोजनाने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. महसूल वाढावा म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले गडकिल्ले लग्नादी कार्याकरिता किरायाने देण्याचा शासनाने घाट रचना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यायाने राज्याच्या वैभवशाली इतिहासचा अपमान असून भाजप सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’ चे आश्वासन हवेत विरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे सोमवारी सायंकाळी बल्लारपुरात आगमन झाल्यानंतर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर मंचावर राजेंद्र वैद्य, राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, बाबासाहेब वासाडे, दीपक जयस्वाल, विधान सभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेंभूर्डे, सूरज चव्हाण, मेहबूब शेख, डी. के आरीकर, सुरेश रामगुंडे, हिराचंद बोरकुटे, कुतुबुद्दीन सिद्दी आदींची उपस्थित होती. खासदार कोल्हे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केला. शिवसेना व भाजपच्या महाजनादेश यात्रेपेक्षा शिवस्वराज्य यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, काही नेते राकाँ सोडून गेल्याने काही फरक पडणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून राकाँ दोन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र वैद्य यांनी केले. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आजी - माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.