ग्रामीण भागात प्रचाराची धूम

By admin | Published: February 11, 2017 12:32 AM2017-02-11T00:32:31+5:302017-02-11T00:32:31+5:30

जिल्हयात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच जोमात वाहू लागले आहेत.

Promoting Dhoom in rural areas | ग्रामीण भागात प्रचाराची धूम

ग्रामीण भागात प्रचाराची धूम

Next

कॉर्नर व प्रचार सभेला ऊत : मतदानासाठी १७ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य
चंद्रपूर : जिल्हयात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच जोमात वाहू लागले आहेत. मतदानाला अगदी सहाच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराला वेग आला आहे. ठिकठिकाणी उमेदवारांच्या कॉर्नर सभा, पक्षांच्या प्रचार सभा सुरू आहेत. दरम्यान, मतदारांना मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या १७ ओळखपत्रापैकी कुठलेही एक ओळखपत्र असणे अनिवार्य असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून शासकीय यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. म्हणजेच प्रचारासाठी आता केवळ पाचच दिवस उमेदवारांकडे शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी तन-मन-धनाने प्रचारात उडी घेतली आहे. कार्यकर्तेही रात्रंदिवस निर्वाचन क्षेत्रात फिरताना दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभा जिल्ह्यात सुरू आहेत. काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांच्याही विविध ठिकाणी सभा होत आहेत. एकूणच प्रचाराला आता चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दुसरीकडे शासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी दररोज दिशानिर्देश केले जात आहे. आयोगाने निर्देशित केल्यानुसार मतदारांना निवडणूक ओळखपत्र व मतदान चिठ्ठी देण्यात आलेली आहे. मतदान करताना ज्या मतदारांना फोटो ओळखपत्र दाखवणे शक्य नाही, अशा मतदारांना फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. परंतु, ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत आहे. मात्र छायाचित्र ओळखपत्र नाही. अशा मतदारांनी ओळख पटविण्यासाठी खालील पैकी कुठलाही पुरावा दाखविणे अनिवार्य व बंधनकारक आहे. त्यामध्ये पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र व राज्य सरकारचे तसेच सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्यसंस्था व खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना निर्गमीत केलेले ओळखपत्र, बँक, पोस्ट आॅफिस यांनी फोटो सहीत निर्गमीत केलेले पास बुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार कार्यक्रम अंतर्गत निर्गमीत केलेले फोटो असलेले जॉबकार्ड, फोटो असलेले आरोग्य विमा योजनेचे स्मार्ट कार्ड व सेवानिवृत्तीचे फोटो असलेले दस्ताऐवज, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र, जातीचे फोटोसहीत निर्गमित केलेले प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले फोटोसह अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेचे फोटोसहीत कागदपत्रे, शस्त्र परवाना, निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्ती याचा फोटो असलेले प्रमाणपत्र, वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र व शिधापत्रिका यापैकी कुठलेही फोटो ओळखपत्र मतदान करतेवेळी ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या निवडणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र निवडणुकीत दारुचा महापूर वाहतो, असा अनुभव असल्याने पोलीस अवैध दारू विक्रीवर करडी नजर ठेवून आहे. (शहर प्रतिनिधी)

१६ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येत असलेल्या क्षेत्रामधील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी १६ फेब्रुवारी गुरुवारला सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. सदर सार्वजनिक सुटी ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात निवडणूका घेण्यात येत आहेत, त्याच कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे इत्यादींना लागू राहील. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्र, नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात तसेच बँका इत्यादीना ही सुटी लागू होणार नाही.

Web Title: Promoting Dhoom in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.