प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करा
By admin | Published: March 11, 2017 12:47 AM2017-03-11T00:47:05+5:302017-03-11T00:47:05+5:30
केंद्र शासनाच्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, ...
हंसराज अहीर यांचे निर्देश : ग्रामीण भागात ८५०० घरांची योजना
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आवास योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, अनिल फुलझेले आदी उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर म्हणाले, सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागात लागू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आतापासूनच केल्यास २०२२ पूर्वीच निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. ग्रामीण भागासाठी आठ हजार ३६३ घरांची योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेशिवाय रमाई आवास, शबरी आवास, आदीम आवास तसेच पंडीत दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरांची उपलब्धता वाढवावी. तसेच बेघरांना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर महानगरात शहरी आवास योजनेतून बेघर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. यात २१ हजार ७०० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १९ हजार ४०८ अर्जाची तपासणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यात झोपडपट्टी पुर्नविकास, कर्ज संलग्न अनुदान खासगी भागीदारी अंतर्गत घरांची निर्मिती आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनुदान योजनेंतर्गत आलेल्या अर्जाचा निपटारा करून प्राधान्याने काम करण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यात विकासनगर, दत्तनगर, मित्रनगर येथील प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या जमिनी उपलब्ध होत असल्यास संबंधित विभागाकडे पाठवून पाठपुरावा करावा, असे निर्देश ना. अहीर यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)