पाऊण कोटींचा मालमत्ता कर थकित; मालमत्ताधारकांनी कर अदा करावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:25 IST2025-01-30T14:21:01+5:302025-01-30T14:25:59+5:30
विकासावर परिणाम : थकीत मालमत्ता कराबाबत नगरपरिषद अलर्ट

Property tax worth Rs 50 crores is pending; property owners should pay the tax
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड नगरपरिषदेचा ७९ लाख ३९ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. या थकीत मालमत्ता कराबाबत नगरपरिषद अलर्ट मोडवर आली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कर वर्षानुवर्षे थकीत आहे, अशा मालमत्ताधारकांनी त्वरित कर अदा करावे, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.
नागभीड नगरपरिषद हद्दीत अनेक भूखंड, मालमत्ता आणि ले-आऊटधारक आहेत. यातील काहींनी वर्षानुवर्षे यावरील कर अदा केला नाही. विकासकामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी नगरपरिषदेचे दैनंदिन कामकाज मालमत्ता करांमधून करण्यात येत असतो. मात्र, नागरिकांकडून अपेक्षित असा मालमत्ता कर वसूल होत नसल्याने दैनंदिन कामकाज चालविताना नगरपरिषदेस विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ७९ लाख ३९ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे.
अन्यथा मालमत्ता होणार जप्त
थकबाकीधारकांनी कर भरणा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. तसेच जप्त केलेली मालमत्ता विक्री करून करवसुली होईल.
असा आहे नगर मालमत्ता कर
सद्य:स्थितीत नागभीड नगरपरिषदेचा मालमत्ता कर ६४ लाख २७ हजार रुपये थकीत असून, चालू मागणी ६६ लाख २६ हजार रुपये असून एकूण मागणी १ कोटी ३१ लाख रुपये आहे. या मागणीपैकी थकीतपैकी ८ लाख ३२ हजार रुपये, तर चालू मागणीपैकी ४५ लाख ५१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. थकीतपैकी ५५ लाख ९५ हजार रुपये, तर चालू मागणीपैकी २३ लाख ४४ हजार असे एकूण ७९ लाख ३९ हजार रुपये कर थकीत आहे.
"नागभीड नगरपरिषदेचा जवळपास ८० लाख रुपये मालमत्ता कर थकीत आहे. थकीत मालमत्ताधारकांनी विनाविलंब मालमत्ता कर जमा करून पावती प्राप्त करून घ्यावी. मालमत्ता जप्तीची वेळ ओढवून घेऊ नये."
- राहुल कंकाळ, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगरपरिषद, नागभीड.