सीडीपीओविरोधात कारवाईचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 01:56 AM2016-11-10T01:56:45+5:302016-11-10T01:56:45+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी दिलेले प्रोटिन पॉवडर सिंदेवाही पंचायत समितीमधील गोदामात धूळ खात पडले होते.

Proposal for action against CDPO | सीडीपीओविरोधात कारवाईचा प्रस्ताव

सीडीपीओविरोधात कारवाईचा प्रस्ताव

Next

प्रोटिन पॉवडरप्रकरण : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे शिक्कामोर्तब
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी दिलेले प्रोटिन पॉवडर सिंदेवाही पंचायत समितीमधील गोदामात धूळ खात पडले होते. त्यावर उंदरांनी ताव मारून नासधूस केली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून नुकसान झालेल्या प्रोटिन पॉवडरप्रकरणी संबंधित सहायक महिला व बालकल्याण अधिकाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. नुकसान झालेल्या प्रोटिन पॉवडरची वसुली करण्याबाबत अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलन करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता आंगणवाडीमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. आंगणवाडीमध्ये येणाऱ्या स्तनदा माता आणि कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी प्रोटिन पॉवडर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पंचायत समितीमधील महिला व बालकल्याण विभागाकडे प्रोटिन पावरडचे २ हजार ८०० पॅकेट उपलब्ध करण्यात आले. मार्च महिन्यात हे प्रोटिन पॅकेट पाठविण्यात आले. त्यांचे वाटप मार्च-२०१७पर्यंत करायचे आहे. २ हजार ८०० पॅकेट्सपैकी बहुसंख्य पॅकेट्सचे वाटप करण्यात आलेले आहे.
सिंदेवाही पंचायत समितीमधील महिला व बालकल्याण विभागाने प्रोटिन पॉवडर ठेवलेल्या खोलीकडे लक्ष न दिल्याने त्यातील ४० पॅकेट्स उंदरांनी फोडले. ते फोडलेले पॅकेट्स लाभार्थ्यांना देण्यात आले नाहीत. याशिवाय शिलाई मशिन, सायकल्स व इतर साहित्यही गोदामात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्याने प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रकरण उजेडात येताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय झोल्हे यांनी तातडीने सिंदेवाहीच्या सहायक महिला व बालकल्याण अधिकारी संध्या केवटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
त्या नोटीसवर केवटे यांचे उत्तर प्राप्त झाले असून कक्ष अधिकारी सोनकर यांनी आपला अहवाल तयार केला आहे. या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय झोल्हे यांनी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना सादर करण्यात येऊन सहायक महिला व बालकल्याण अधिकाऱ्याकडून नुकसान झालेल्या प्रोटिन पॉवरडची किंमत वसूल केली जाणार असल्याचे सांगितले.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी झोल्हे यांनी सर्व पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांच्याकडून साहित्य वितरणाबाबत माहिती जाणून घेतली. काही पंचायत समित्यांमध्ये अद्याप काही साहित्य वाटप झाले नसल्याचे आढळून आले असून ते तातडीने वाटप करण्याचे निर्देश झोल्हे यांनी दिले. महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा निधीतून साहित्य खरेदी करून जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे पाठविण्यात आले.
हे साहित्य पंचायत समितीस्तरावर लाभार्थ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील काही साहित्य सिंदेवाही पंचायत समितीच्या गोदामात पडून असल्याचे उघडकीस आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Proposal for action against CDPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.