१९ गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:34+5:302021-07-30T04:30:34+5:30
बल्लारपूर : बल्लारपूर शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे येथे सर्व भाषिक वर्गाचे वास्तव्य आहे. तसेच गुन्हेगारी ...
बल्लारपूर : बल्लारपूर शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे येथे सर्व भाषिक वर्गाचे वास्तव्य आहे. तसेच गुन्हेगारी तत्त्वांचाही वावर आहे. यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर कसा वचक ठेवता येईल याचा प्रत्येक ठाणेदाराने प्रयत्न केला आहे. परंतु कोळसा खाण परिसरात फोफावणारा कोळसा चोरीचा व्यवसाय व अवैध दारू विक्रेत्यांचा प्रभाव यामुळे शहराचे वातावरण अधिक मलिन न व्हावे यासाठी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर १९ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवला आहे.
पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले की २०२० मध्ये १० गुन्हेगार तडीपार होते तर यावर्षी सूरज बहुरिया हत्याकांडातील बच्ची गँगचे सहा गुन्हेगार व इतर दोन असे आठ गुन्हेगार तडीपार आहेत. या शिवाय अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची दखल घेऊन पोलीस ठाण्यातर्फे १९ गुन्हेगारांची यादी संबंधित विभागाकडे व वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. हे गुन्हेगार जर शहरात राहतील तर गुन्ह्यात सतत वाढ होतच राहील. गुन्हा घडला की पोलीस कारवाई करते. यानंतर त्याची जमानत होते व तो पुन्हा आपल्या विरोधकांचा वचपा काढण्यास गुन्हा करतो. यामुळे अशा गुन्हेगारांना तडीपार करणे आवश्यक आहे. गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती पत्रक काढून नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आली आहे. तरी सुद्धा गुन्हेगारांनी देशी कट्टा, तलवार घेऊन धिंगाणा करणे सुरूच ठेवले. असे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे.
290721\crime (1).jpg
क्राईम मोनो