म्युकरमायकोसिसवरील औषधी पुरवठ्याचे प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 05:00 AM2021-05-16T05:00:00+5:302021-05-16T05:00:37+5:30
आयसीयू वार्डातील रूग्ण हा ऑक्सिजन मास्क लावून असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे रूग्णाच्या बेडजवळ बेल लावावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नवीन रूग्ण दाखल झाल्यास त्यापूर्वी अन्य रूग्णांनी वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलावे. रात्री रूग्णांचे मास्क निघून ऑक्सिजन पुरवठा बंद होऊ शकतो. याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोविड संसर्गानंतर म्युकरमायकोसिस आजाराचे रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेमडेसिविर प्रमाणेच म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन व औषध पुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, कोविड आजारातून बाहेर पडल्यानंतर रूग्णांची साखर वाढणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. यावर विशेष लक्ष दिल्यास रोगावर मात करता येऊ शकेल. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण, मृत्युदर वाढत आहे. त्यासाठी विविध कारणे समोर येत आहेत. त्याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला दिल्या.
आयसीयु वार्डात गंभीरतेने लक्ष द्या
आयसीयू वार्डातील रूग्ण हा ऑक्सिजन मास्क लावून असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे रूग्णाच्या बेडजवळ बेल लावावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नवीन रूग्ण दाखल झाल्यास त्यापूर्वी अन्य रूग्णांनी वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलावे. रात्री रूग्णांचे मास्क निघून ऑक्सिजन पुरवठा बंद होऊ शकतो. याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
म्युकरमायकोसिससाठी वेगळा कक्ष
म्युकरमायकोसिस रोगाच्या उपचारासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीला तीव्र डोकेदुखी, डोळेदुखी, डोळ्यांवर सूज व नाक बंद होणे यासारखी लक्षणे आढळल्यास कक्षाशी संपर्क साधावा. या रोगावर तातडीने उपचार, उपाययोजना व जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.