सहा महिन्यांपासून मंत्रालयात अडकला ४१ कोटी ७६ लाखांचा प्रस्ताव; मेडिकल कॉलेजची अर्थकोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:01 IST2024-12-28T14:00:09+5:302024-12-28T14:01:03+5:30

Chandrapur : नवीन इमारतीत लाकडी फर्निचर व यंत्रसामग्री नाही

Proposal of Rs 41 crore 76 lakh stuck in the ministry for six months; Medical college in financial crisis | सहा महिन्यांपासून मंत्रालयात अडकला ४१ कोटी ७६ लाखांचा प्रस्ताव; मेडिकल कॉलेजची अर्थकोंडी

Proposal of Rs 41 crore 76 lakh stuck in the ministry for six months; Medical college in financial crisis

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
शहरातील बाबूपेठ बायपास मार्गावर जवळपास ५० एकर जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले. मात्र, राज्य शासनाकडे सहा महिन्यांपासून ४१ कोटी ७६ लाखांचा प्रस्ताव पडून असल्याने अर्थकोंडीत अडकलेल्या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीत अजूनही लाकडी फर्निचर व यंत्रसामुग्री लागली नाही.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीने सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी मोठा आधार मिळाला; परंतु काळानुसार अजूनही अत्याधुनिक सोई सुविधा येथे आल्या नाहीत. महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून यासाठी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने काही नव्या सुविधा सुरू होऊ शकल्या. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमुळे प्रशिक्षण व आरोग्यसेवेच्या दृष्टीने बूस्टर मिळण्याची आशा निर्माण झाली. या रुग्णालय व महाविद्यालयाकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीचा अभ्यासपूर्वक प्रस्ताव तयार करण्यात आला. आवश्यक यंत्रसामुग्री, सध्या रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री आणि यापैकी ज्या यंत्रसामुग्री संस्थेत मानकाप्रमाणे आवश्यक आहे; परंतु ती यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. अशा यंत्रसामुग्रीचा ४२ कोटी ७१ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा प्रस्ताव संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना सादर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावात ई- उपकरण प्रणाली किमतींमध्ये तफावत आढळून आली. ही त्रुटी पूर्ण करण्याबाबत, तसेच प्रस्तावाची संपूर्ण छाननी करून अचूक व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. 


या अनुषंगाने संस्थेमार्फत १९ मार्च २०२४ च्या प्रस्तावातील ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करून ४१ कोटी ७६ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ई-उपकरण प्रणालीमध्ये दर्शविलेल्या यंत्रसामुग्रीच्या किमतीबाबत संस्थेतील विभागांना किमती मान्य आहेत. आता केवळ राज्य शासनाने मंजुरी देण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, सहा महिन्यांपासून हा प्रस्ताव पडून आहे. याबाबत नवीन सरकार काय निर्णय घेते, याकडे आता वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


वैद्यकीय अधिष्ठातांनी राज्य शासनाकडे सादर केला प्रस्ताव

  • चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी ५७ कोटी, तर मेडिकल साहित्यासाठी ४१ कोटी ७६ लाखांची आवश्यकता आहे. 
  • कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी साहित्य खरेदीसाठी निधी मागणीबाबतचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच राज्य शासनाकडे सादर केला आहे.


अशी आहे स्थिती 

  • ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करण्यात आली.
  • यंत्रसामुग्रीच्या किमती संस्थेतील विभागांनी मान्य केली. 
  • राज्य शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालय इमारतीला निधी न मिळाल्याने अभावी लाकडी फर्निचर व साहित्य खरेदी ठप्प

Web Title: Proposal of Rs 41 crore 76 lakh stuck in the ministry for six months; Medical college in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.