त्या आरोपीवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:10+5:302021-06-11T04:20:10+5:30
सिंदेवाही : गुप्तधन आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हत्या केली जाते. सिंदेवाहीजवळील जंगलामध्ये वाघाच्या अवयवांचा गुप्तधन ...
सिंदेवाही : गुप्तधन आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हत्या केली जाते. सिंदेवाहीजवळील जंगलामध्ये वाघाच्या अवयवांचा गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी वापर करणार्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यातील आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केली आहे.
केवळ वाघच नाही तर अंधश्रद्धेने बरबटलेल्या अशा टोळ्या गुप्तधन, पैशाचा पाऊस पाडणे, असाध्य आजार बरे करणे आदींसाठी कासव, घुबड, अस्वल, खवल्या मांजर, मांडोळ साप आदींची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. तसेच पांढरा आणि पिवळा पळस या दुर्मीळ वृक्षांचासुद्धा अघोरी कृत्यांसाठी बळी दिला जातो. अशा अघोरी कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ साली महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा संमत केला. यानुसार मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत शोधण्याच्या बहाण्याने करणी, भानामतीच्या नावाखाली अघोरी कृत्य करीत असेल तर तो गुन्हा आहे. म्हणून सिंदेवाही येथील घटनेत अटक झालेल्या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यासोबतच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वनविभागाने वन्यजीव व अंधश्रद्धा या महत्त्वपूर्ण विषयाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्याची मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हाध्यक्ष ॲड. गोविंद भेंडारकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, सहसचिव अनिल लोनबले, वन्यजीव अभ्यासक यशवंत कायरकर, महिला संघटिका रजनी कार्लेकर, प्रा. बालाजी दमकोंडवार, सुजित खोजरे, नीलेश पाझारे यांनी केली आहे.
===Photopath===
100621\img-20210610-wa0053.jpg
===Caption===
वाघ अवयव अघोरी कृत्य प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी.
अ.भा. अंधश्रधा निर्मूलन समितीची मागणी