वाघांच्या संरक्षणासाठी ४० कमांडो तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:34 PM2017-12-05T23:34:06+5:302017-12-05T23:34:29+5:30
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ८० च्या जवळपास असणारे वाघ व अन्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊन ४० कमांडो कोर झोनमध्ये मंगळवारपासून सक्रीय झाले आहेत. चित्याप्रमाणे कारवाईसाठी सज्ज असणारे हे जवान तामीळनाडूतील अनुभवी वरिष्ठांकडून प्रशिक्षण घेऊन आले आहेत.
आगरझरी येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये तीन दिवसांचे कमांडो प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. तामिळनाडूमध्ये वन्यजीव संरक्षणाचा दांडगा अनुभव असणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताडोबा येथे येऊन हे प्रशिक्षण दिले. वाघांची शिकार करणारे शिकारी, तस्कर, जंगलात चोरी करणारे चोर, अवैध लाकूड तोड आणि परिसरात घुसखोरी करणारे असामाजिक तत्व यांना धडा शिकविण्यासाठी हे कमांडो कार्यरत असणार आहेत.
सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांच्या उपस्थितीत ताडोबाच्या या ४० कमांडोंना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) किशोर मानकर, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, निवृत्त वरिष्ठ अधिकारी अरुण तिखे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.
यावेळी कमांडो प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. चोरुन लाकूड तोड करणारे आणि वन्यजीवाला धोका पोहचवणाºया तस्करांना जेरबंद करण्यासाठी आकस्मिक व्यूहरचनेचे प्रात्यक्षिक लक्षवेधी होते. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांतर्फे सुरज मेश्राम, वैशाली जेणेकर, श्रीकृष्ण नागरे, दिलेश्वरी वाढई आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या दलातील महिला कमांडोचाही सत्कार करण्यात आला. कमांडो दलातील महिला ताडोबातील वाघिणीसारख्या चपळ असल्याचे गौरवोद्गार उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर मानकर यांनी केले. यावेळी त्यांनी राज्य शासनामार्फत कोर व बफर भागातील पुनर्वसित गावासाठी केले जात असलेले प्रयत्न व नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद, कमांडो दलाची आवश्यकता या संदर्भात माहिती दिली. आभार सहायक वनसरंक्षक शंकर घुपसे यांनी मानले.
ताडोबा देशासाठी महत्त्वाचे -शिवाजी साटम
ताडोबा हे चंद्रपूरसाठी, महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्वाचे पर्यटनस्थळ आहे. वाघाची काळजी घेण्यासाठी वन्यजीवांचा हल्ला सोसणाऱ्या परिवारातील तरुण पुढे येतात आणि जगासाठी वाघ सुरक्षित ठेवतात. ही बाब अतिशय महत्वपूर्ण आहे, असे मत सिनेअभिनेते शिवाजी साटम यांनी व्यक्त केले. ताडोबावर माझे प्रेम असल्यामुळे मी कायम या ठिकाणी येत राहतो. मला आवडणाऱ्या वाघांसाठी राज्य शासन विविध प्रकारे प्रयत्न करते. त्यासाठी जवानांना प्रशिक्षित करते. ही बाब आज प्रत्यक्ष बघून समाधान वाटते. खरे हिरो संरक्षणकर्ते जवान आहेत. त्यांना मी सलाम करतो, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.