गावकऱ्यांचा ठिय्या; तरीही पाणीपुरवठा नाहीच; विसापूर ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:59 PM2024-09-24T14:59:49+5:302024-09-24T15:00:37+5:30

Chandrapur : पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ग्रामपंचायतीने दिले लेखी आश्वासन

Protest of the villagers; Still no water supply; Poor planning of Visapur Gram Panchayat | गावकऱ्यांचा ठिय्या; तरीही पाणीपुरवठा नाहीच; विसापूर ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन

Protest of the villagers; Still no water supply; Poor planning of Visapur Gram Panchayat

लोकमत न्यूज नेटवर्क 
विसापूर :
पाण्याची कोणतीही कृत्रिम टंचाई नसताना विसापूर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनापायी मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही विसापूर गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे


याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळे 'लोकमत'ने यापूर्वी गावकऱ्यांचा संयमाचा बांध कधीही फुटून ते मोर्चा काढून संबंधितांना धारेवर धरू शकतात, असे भाकीत केले होते. ते अखेर खरे ठरले व गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी संदीप पोडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मोर्चा काढून ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रामपंचायतीकडून ग्रामसचिव किशोर धकाते यांनी लेखी आश्वासन देत २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, यापूर्वीही दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. पण अजूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे आतातरी गावकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंप हाऊसची इंटक मोटार ही फार जुनी असून, तिचे आयुष्य संपले आहे. ती नवीन घेण्याशिवाय पर्याय नाही, याची माहिती ग्रामपंचायतीत नवीन सत्ता बसली तेव्हाच सर्व सदस्यांना माहीत होते. 


यावर ठरावसुद्धा घेण्यात आला. परंतु, नियोजनाअभावी आजतागायत तीच जुनी मोटार वारंवार दुरुस्त करून तिचा वापर सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना नदीला मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत यापूर्वी 'लोकमत'ने प्रकाश टाकला व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे भाकीत केले होते. परंतु, कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी भाजपा नेते संदीप पोडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला जेरीस आणले. यावेळी सरपंच अनुपस्थित असल्याने उपसरपंच व ग्रामसचिवांना गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागला. अखेर ग्रामसचिव किशोर धकाते यांनी २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 


ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन 
बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापुरात मागील एक वर्षापासून ना त्या कारणाने अधूनमधून पाणीपुरवठा बंद पडत आहे. 
यावेळी दोन महिन्यांपासून योजना ठप्प पडली आहे. कधी वीज कपातीमुळे तर कधी पंप हाऊसची इंटक मोटरच्या बिघाडामुळे नळपाणी पुरवठा बंद असते. ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.
 

Web Title: Protest of the villagers; Still no water supply; Poor planning of Visapur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.