लाभांच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात
By admin | Published: July 9, 2014 11:23 PM2014-07-09T23:23:25+5:302014-07-09T23:23:25+5:30
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ही विकासाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण् सर्वांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या
तळोधी(बा.) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ही विकासाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण् सर्वांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्याकरिता तत्पर असले पाहिजे, असे मत पंचायत समितीचे उपसभापती दिनेश गावंडे यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती नागभीडतर्फे आयोजित मुख्याध्यापक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शैक्षणिक सत्र २०१४- २०१५ ची शाळा पूर्व तयारी व नियोजन कार्यशाळा पंंचायत समिती नागभीडच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींना १९ लाख ९८ हजार रुपये खर्चून सायकलीचे व पंचायत समितीच्या शेष फंडातून १ लाख किमतीच्या स्कूल बॅग तसेच मागील शैक्षणिक सत्रातील नवरत्न पुरस्कार स्पर्धा पारितोषिक वितरण आयोजित केला होता. या लाभांच्या योजनांबरोबरच ग्रामीण विद्यार्थी हा जागतिक स्पर्धेत टिकावा यासाठी त्याला दर्जेदार शिक्षण देणे ही काळाची गरज समजून सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. तसेच कॉन्व्हेंटच्या तुलनेत आपण कमी पडू नये यासाठी इयत्ता १ ली पासूनच सर्व शाळांमध्ये सेमी इंंग्रजीचे वर्ग सुरू केले पाहिजे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तोडेवार यांनी काही शाळांचे कार्य हे उल्लेखनीय असून इतरही शाळांनी अनुकरण करावे व गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे विनंती केली. प्रास्ताविक माणिक खुणे, संचालन साखरकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)