कोविड रूग्णांना सर्वोत्तम सुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:00 AM2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:45+5:30
महिला रूग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले. आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्या वाढविल्याने बाधित पुढे येत आहेत. रूग्णांचा अहवाल येईपर्यंत होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात ४०० बेड वाढवून देण्याची कार्यवाही झाली. जिल्ह्याला दीडहजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटात रूग्णांना सर्वोउत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात. त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपाययोजना तातडीने उपलब्ध कराव्यात. वैद्यकीय रूग्णालयाच्या निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य समस्या तातडीने सोडविण्याची मागणी ना. देशमुख यांच्याकडे केली. बैठकीनंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्माणाधीन इमारतीची पाहणी केली.
प्रत्येक तालुक्यात ५० ऑक्सिजन बेड्स : विजय वडेट्टीवार
महिला रूग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले. आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्या वाढविल्याने बाधित पुढे येत आहेत. रूग्णांचा अहवाल येईपर्यंत होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात ४०० बेड वाढवून देण्याची कार्यवाही झाली. जिल्ह्याला दीडहजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
ना. देशमुखांच्या बैठकीत भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलल्याची चर्चा
चंद्रपूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख हे मंगळवारी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला शासनाच्या प्रोटोकाॅलप्रमाणे सर्व आमदारांना निमंत्रित करणे गरजेचे होते. मात्र काँग्रेस आमदारांसह एक अपक्ष आमदारांनाच या बैठकीचे निमंत्रण दिले. जिल्ह्यात माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार व चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे दोन भाजपचे आमदार आहेत. त्यांना या बैठकीला निमंत्रितच करण्यात आले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांनाही बैठकीचे निमंत्रण नसल्याचे समजते. ही राज्याच्या मंत्र्यांची बैठक होती वा काँग्रेसची, कोरोनाची लढाई सर्व राजकीय मतभेद विसरून लढण्याची गरज असताना हा भेदभाव का, असे सवालही यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
आरोग्यसेवक कंत्राटी पद्धतीने घ्यावे
वैद्यकीय कर्मचाºयांना निवासाची व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण घेणाºया मुला-मुलींचे वसतीगृह, अग्निसुरक्षा व्यवस्थेची माहिती प्रकल्प प्रमुख विनोद कुमार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली. महिला रूग्णालयाला भेट देत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्यसेवक नियुक्त करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.