धान पिकाचे तातडीने सर्वेक्षण करुन आर्थिक मदत द्या
By admin | Published: November 20, 2014 10:50 PM2014-11-20T22:50:13+5:302014-11-20T22:50:13+5:30
मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले.
चंद्रपूर : मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले. त्यामुळे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाईकरीता शासनाकडे अहवाल सादर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आपदग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करुन नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची विनंती केली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे गोलाभूज तलाव न भरला नाही. रोवणीनंतर केवळ एकदाच तलावातील पाणी काही मोजक्याच गावातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले. मात्र तलावात पुरेशे पाणी नसल्याची सबब पुढे करुन पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या धान पिकास सिंचनाची सोय न झाल्याने शेकडो हेक्टर शेतजमिनीमधील धानाचे पीक नष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षन होत नसल्याने रस्त्याच्या लगत असलेल्या जमिनीमधील पिकांना अपेक्षित धरुन संबंधित अधिकारी आणेवारी घोषित करीत आहेत. त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
यावर्षीही शेतकऱ्यांवर दरवर्षीसारखा अन्याय होऊ नये, गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली त्या पिकांची प्रत्यक्ष मोका चौकशी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार मूल व संबंधित तलाठ्यांना देण्यात यावे, अशी मागणी गांगलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराबाई चांभारे, उपसरपंच शालिकराम चांभारे, श्रीहरी चांभारे, सोनबाजी केवे, विनोद चांभारे, विठ्ठल काटकर, आत्माराम चिचघरे, शामसुंदर कडस्कर, चिखलीचे सरपंच लहुजी कडस्कर, मुकूंदराव खोडपे, संपतराव जेंगठे तसेच अन्य गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)