बांधकाम मजुरांना आर्थिक लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:31 AM2021-08-13T04:31:41+5:302021-08-13T04:31:41+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, ...
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, शासनाकडून मिळणारी किटही काही मजुरांना अद्यापही मिळाली नाही. त्यातच काही मजुरांना प्रशासकीय भवन परिसरात अधिकाऱ्यांकडून बोलविल्या जात आहे. मात्र यामध्ये त्यांची मजुरी बुडत आहे. त्यामुळे नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम मजुरांना त्यांच्या घरापर्यंत किट पोहचवून द्यावी, यातून त्यांचे आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण आर्थिक अडचणीत आहे. यामध्ये बांधकाम मजुरांसह इतर मजुरांवरही बराचसा ताण पडला आहे. त्यामुळे शासनाने या मजुरांना मदत देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, बांधकाम मजुरांना शासनाद्वारे सुरक्षा किट पुरविली जात आहे. मात्र यासाठी त्यांना स्वत: जवळचे पैसे खर्च करावे लागत आहे. विविध कागदपत्रे तसेच शहरात येण्याचा खर्च करून मजुरीही बुडत आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने बांधकाम मजुरांना त्वरित सुरक्षा किट देण्याची मागणीही भूमिपुत्र ब्रिगेडचे विवेक बोरीकर यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.