झोपडपट्टीवासीय तथा सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणार
By Admin | Published: November 16, 2016 12:55 AM2016-11-16T00:55:04+5:302016-11-16T00:55:04+5:30
केंद्रात सत्ता स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीक्षेपात ठेवून सुरू केल्या.
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने व्हावी
चंद्रपूर : केंद्रात सत्ता स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीक्षेपात ठेवून सुरू केल्या. सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासनाने नागरी भागातील राज्य व केंद्र सरकारच्या समान अर्थसहाय्यातून प्रधानमंत्री आवास योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून जगाच्या पाठीवर अशा प्रकारच्या धाडसी निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. या योजनेच्या यशाकरिता यंत्रणामधील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचविण्याकरिता परिश्रम घ्यावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मागणी सर्वेक्षण कार्यशाळेच्या शुभारंभ ते बोलत होते. महानगरपालिका सभागृहामध्ये १४ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यशाळेस महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, भाजपा गटनेते अनिल फुलझेले, धनंजय हूड, ऐस्तेर शिरवार, राहूल सराफ सर्व नगरसेवक, मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर म्हणाले, ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी असून या योजनेमुळे घरांचे स्वप्न बघणाऱ्या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील कुटूंबियांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. यातून सर्वांचा विकास ही पंतप्रधानांची भूमिका प्रत्यक्षात उतरत आहे. निवाऱ्यापासून वंचित लोकांचे स्वप्न या योजनेमुळे साकार होणार आहे. आजवर गोर गरीबांच्या हिताच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरी त्यांना आर्थिक स्थैर्य व सक्षमता लाभली नाही. मात्र आता सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळत आहे, असेही ते म्हणाले.
कार्यशाळेत मनपा महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, आयुक्त संजय काकडे, यांनीही या योजनेच्या माध्यमातून फार मोठे कार्य चंद्रपूर महानगरात घडणार असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी ललीता तेलंग या प्रथम लाभार्थी महिलेचा संगणकीय अर्ज भरण्यात आला. या
कार्यशाळेत चंद्रपूर शहरातील शेकडो लाभार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)