ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध करा, अन्यथा रुग्णालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:36+5:302021-05-03T04:22:36+5:30
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यासह राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती बिकट झाली आहे. वैद्यकीय सुविधासुद्धा अपुऱ्या ...
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यासह राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती बिकट झाली आहे. वैद्यकीय सुविधासुद्धा अपुऱ्या पडत आहेत. व्हेंटिलेटर्सअभावी कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू पावत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याकरिता प्रशासनाने तात्काळ ५० ऑक्सिजनयुक्त बेड व गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्स उपलब्ध करावे, अन्यथा ५ मेपासून उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिलेला आहे.
याबाबत ३० एप्रिल रोजी निमकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा प्रशासन व स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांना मागणीची पूर्तता न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याबाबत निवेदन दिले आहे. राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड विभागात मृत्यूचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. येथील कोविड रुग्णालयात एकूण ४६ बेड असून, त्यापैकी फक्त २३ बेड हे ऑक्सिजनयुक्त आहे. अपुऱ्या ऑक्सिजन बेडमुळे रुग्णांना मृत्यूच्या दारात ढकलल्या जात आहे. कोविड केंद्रावर भरती होत असलेल्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल ६५ पर्यंत जात असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे, असे निमकर यांनी म्हटले आहे.