घोडाझरी, आसोलामेंढा तलावाचे पाणी पिकांसाठी तातडीने द्या
By Admin | Published: September 26, 2015 12:57 AM2015-09-26T00:57:54+5:302015-09-26T00:57:54+5:30
यंदा खरीपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याअभावी सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील धान, ....
धान पिकांचा प्रश्न : विजय वडेट्टीवार यांची मागणी
चंद्रपूर : यंदा खरीपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याअभावी सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील धान, सोयाबिन या पिकांसह अनेक पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडलेला असला तरी त्या पावसाने शेपिकांना पुरेसा पाणी होऊ शकत नाही. पाण्याअभावी शेतातील उभे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे घोडाझरी तलावाचे पाणी २६ सप्टेंबरपासून आणि आसोलामेंढा तलावाचे पाणी २९ सप्टेंबरपासून सोडून सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सिंचाई विभाग चंद्रपूर यांना पाठविलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, यंदा खरीपाचा हंगाम सुरू होताच पाऊस पडल्यामुळे सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून धान, सोयाबीन यासह अनेक पिकांची लागवड केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे बी-बियाणे नष्ट झाले. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. दरवर्षी पेक्षा यावर्षी धान आणि सोयाबिन या पिकाची पेरणी करण्याकरीता दुपट्टीने खर्च आलेला आहे.
शेतीशिवाय दुसरे साधन नसल्यामुळे दिवसंरात्र एक करुन शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जागली जात आहे. त्यामुळे घोडाझरी व आसोलामेंढा तलावाचे पाणी त्वरीत सोडून पिकांना जीवत देण्याची मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)