जिल्ह्यात फळबाग लागवडीला देणार चालना

By admin | Published: September 12, 2016 12:44 AM2016-09-12T00:44:19+5:302016-09-12T00:44:19+5:30

जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Providing fruit cultivation in the district | जिल्ह्यात फळबाग लागवडीला देणार चालना

जिल्ह्यात फळबाग लागवडीला देणार चालना

Next

एमआरईजीएसचा लाभ : २०१५-१६मध्ये फळ पिकांखाली १३७ हेक्टर क्षेत्र
चंद्रपूर : जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही लागवड शेतीमध्ये सलग करण्याऐवजी बांधावर, शेततळे आदी जेथे जागा उपलब्ध होईल, तेथे करण्यात येत आहे. २०१५-१६मध्ये १३७ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यावर्षी एमआरईजीएसमधून ३० नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड केली जाणार आहे.
यापूर्वी राज्यात रोजगार हमी योजना कार्यान्वित होती. केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करून १०० दिवस रोजगार देण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या योजनेला जोड देऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. त्याअंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनी कृषी सहायकनिहाय १० हेक्टरमध्ये एमआरईजीएसअंतर्गत फळ झाडे लागवड करण्याचे ठरविले आहे.
फळबाग योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, पेरू, केळी, आंबा, पपई, आवळा, सीताफळ आदींची लागवड करण्यात येत आहे. ही फळ झाडे खासगी रोपवाटिका, किसान नर्सरी आदीमधून रोपे घेऊन करण्यात येत आहे. एमआरईजीएसअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि जॉब कार्डधारक लोकांना फळ झाडे लावण्याचे काम देण्यात येत आहे. त्यानंतर एमआरईजीएसच्या निकषानुसार, वेतन देण्यात येत आहे. रोजंदार मजुरामार्फत काम करण्यात येत असल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. शासनाकडून रोपांचा पुरवठा करण्यात येतो आणि ते रोपे लावण्याचे काम मजुरांवर सोपविण्यात येते.
आधी रोजगगार हमी योजनेत कृषी विभागाची यंत्रणा फळबाग लागवड करीत असे. सलग शेती क्षेत्रात ही लागवड कृषी विभागामार्फत केली जात असे.
त्याकरिता १०० अनुदानावर रोपांचा पुरवठा केला जात असे. शेतकऱ्यांना फळबाग विकसित करण्यास सांगण्यात येत असे. एमआरईजीएसमध्ये सलग शेती क्षेत्राची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतीचा बांध, शेततळे आदी जागेवरही ही फळ झाडे लावण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)

आंबा, चिकूची लागवड
कृषी विभागातर्फे २०१५-१६ मध्ये १३७ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३९.५० हेक्टरमध्ये कागदी लिंबाची लागवड करण्यात आली. त्यानंतर आंबा कलमे २७ हेक्टर, पपई १७ हेक्टर, पेरू १७.४० हेक्टर, मोसंबी ४ हेक्टर, चिकू ८ हेक्टर, डाळींब ०.६० हेक्टर, केळी १.५ हेक्टर, आवळा १० हेक्टर आणि सीताफळाची १२ हेक्टरवर लागवड करण्यात येत आहे.

३३८६ हेक्टरचे उद्दिष्ट
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत एक कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात ३३८६.९१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये आंबा, चिकू, साग, शेवगा, संत्रा आणि कोरववाहू फळांचा समावेश राहणार आहे. ही फळ झाडे मजुरांना वेतन देऊन लावण्यात येणार आहेत. त्याकरिता सलग क्षेत्राची गरज नाही.

ईजीएसची प्रतीक्षा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ६७.७१ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यास १०० टक्के अनुदानावर रोपांचा पुरवठा करण्यात येईल.

Web Title: Providing fruit cultivation in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.