पुलाची उंची वाढविण्यासाठी ७० कोटींची तरतूद
By admin | Published: October 22, 2015 12:52 AM2015-10-22T00:52:36+5:302015-10-22T00:52:36+5:30
आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळात विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून क्षेत्राच्या विकास कामांकरिता मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
बल्लारपूर-राजुरा मार्गावरील पूल : संजय धोटे यांची माहिती
राजुरा : आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळात विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून क्षेत्राच्या विकास कामांकरिता मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित समस्यांची सोडवणूक केली जात आहे. राजुरा- बामणी-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या कामाकरिता ७० कोटी रुपये किमतीच्या अंदाजपत्रकीय प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. १० करोड रुपयांचा निधी विभागाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती राजुऱ्याचे आमदार संजय धोटे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, राज्यपाल यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास निधीअंतर्गत आदिवासी समाजाच्या सामाजिक संस्कृतीचे जतन करण्याकरिता लक्कडकोट येथे २५ लक्ष रुपये खर्चाच्या ग्रामराज भवनच्या निर्मितीला मंजुरी प्राप्त झाली आहे. क्षेत्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक प्रगतीकरिता ग्रामीण भागातील महिलांद्वारे उत्पादित विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता विशेष मार्केटिंग मॉलच्या निर्मितीबाबत प्रस्तावाला शासनाने तत्वता मान्यता दिली आहे. यावर प्रशासकीय कार्यवाही प्रगतिपथावर आहे. तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या उर्वरीत बांधकामाकरिता आवश्यक ७० लाख रूपयाची तरतुद मार्च २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत राजुरा- बामणी-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याचे काम आवश्यक तांत्रिक मंजुरीनंतर सुरू होईल, असेही धोटे यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजनेंतर्गत अंदाजे १० कोटी २३ लक्ष ६५ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये ई-लर्निग शिक्षणाचे जाळे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून २० लक्ष रुपये खर्चाच्या शालेय अभ्यासक्रम व्हीसीडी वितरित करण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३० बंधाऱ्यांचे काम प्रगतिपथावर असून त्यापैकी १७ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)