पीआरटी थांबविणार मानव - वन्यजीव संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:00 AM2021-08-09T05:00:00+5:302021-08-09T05:00:32+5:30
संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे
दत्तात्रय दलाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : जंगलालगतच्या गावातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाकडून गावागावात पीआरटी (प्राथमिक बचाव दल) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे गावातीलच नागरिकांच्या सहकार्याने व जनजागृतीने येत्या काळात मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
ब्रम्हपुरी वनविभागाची व्याप्ती फार मोठी आहे. वनविभागाची उत्तर व दक्षिण अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. उत्तर वनविभागाचे क्षेत्र जवळपास १४ हजार हेक्टर तर दक्षिण वनविभागाचे क्षेत्र १६ हजार हेक्टर आहे. येथे साग, अंजन, बेहडा, सालई, मोहगणी, मोह, तेंदू, चार, धावडा, बिना, खैर, हीवर, सैना, शिवण, बांबू आदी वृक्ष आहेत. येथील वातावरण वन्य प्राण्यांकरिता पोषक असल्याने विविध पशू, पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाघ व बिबट मोठ्या संख्येत आहेत.
मागील पाच वर्षात दोन्ही विभागात जंगलालगतच्या गावांतील जवळपास २० नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांवर हल्ले होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक पाळीव जनावरांचाही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा संघर्ष टाळता यावा, यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने गावागावात पीआरटीची स्थापना केली आहे.
पीआरटींना दिले जाणार विशेष प्रशिक्षण
संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे
३३ गावात १६५ प्राथमिक बचाव दल
३३ गावात प्रत्येकी पाच असे एकूण १६५ पीआरटी स्थापन करण्यात आले आहेत. गावातील नागरिक, गुराखी यांना जंगलात जाण्यापासून थांबविणे, वृक्षतोड थांबविण्यात मोलाचे सहकार्य लाभणार आहे. जनजागृतीमुळे मानव - वन्यजीव संघर्ष पीआरटीच्या सहकार्याने टाळता येणार आहे.
मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी वनविभागातर्फे गावकरी व वनविभागामधील दुवा म्हणून प्राथमिक बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. मानव - वन्यजीव संघर्ष टाळता यावा, जीवितहानी होऊ नये याकरिता केलेला हा एक चांगला प्रयत्न आहे.
- पी.एच. ब्राम्हणे
वनपरिक्षेत्राधिकारी, उत्तर, ब्रम्हपुरी.