स्मार्ट टेक्नॉलॉजीतून तरूणाईमध्ये मनोविकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:13 PM2018-01-30T23:13:39+5:302018-01-30T23:15:05+5:30
१७ वर्षांची चंद्रपुरातील एक युवती महाविद्यालयात जाण्यापूर्वी दररोज सकाळी स्मार्ट फोनद्वारे स्वत:चे छायाचित्र काढून फेसबुकवर अपलोड करायची. लाईक्स मिळाले, की आनंदाला उधान. लाईक्स घटताच डिप्रेशन...हा प्रकार पाच महिने सुरू होता.
राजेश मडावी ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : १७ वर्षांची चंद्रपुरातील एक युवती महाविद्यालयात जाण्यापूर्वी दररोज सकाळी स्मार्ट फोनद्वारे स्वत:चे छायाचित्र काढून फेसबुकवर अपलोड करायची. लाईक्स मिळाले, की आनंदाला उधान. लाईक्स घटताच डिप्रेशन...हा प्रकार पाच महिने सुरू होता. पालकांनी डॉक्टरांकडे दाखविताच तिला बॉडी डिस्मॉर्फिक डिसआॅर्डर हा मनोविकार जडल्याचे निदान पुढे आले आहे. स्वत:च्या प्रतिमेला गोंजरणे हा या आजाराचा केंद्रबिंंदू असतो. यातून अनेक मनोविकार जडतात. आयुष्य उद्ध्वस्त होते. १६ ते २५ वयोगटातील तरुणाई स्मार्ट टेक्नॉलाजीच्या अतिव्यसनात अडकल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण असून शहरातील पालकांच्या उरात धडकी भरविणारे आहे. समाजाला विषण्ण करणाºया अशा घटनांपासून सावध झाले नाही, तर हा आॅक्टोपस कुटुंबसंस्थेच्या मुळावरच उठू शकतो.
विज्ञानाच्या शोध-संशोधनातून भारतात १९९५ मध्ये मोबाईलचे आगमन झाले. ही मोबाईल क्रांती झपाट्याने शहर, तालुक्यांसह गावखेड्यांत पोहोचली. अत्याधुनिक मोबाईल दुकानांची गर्दी वाढली. स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे फेसबुक, इंटरनेट, इंस्टाग्राम आदी तंत्रज्ञानातून हाताच्या बोटांमध्ये जग आले. मात्र, या तंत्रज्ञानच्या दुष्परिणातून वेगवेगळे मनोविकार जळल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. चंद्रपुरातील तरुणाई देखील या तांत्रिक व्यसनाच्या तावडीत सापडल्याचे निरीक्षण मनोविकारतज्ज्ञ नोंदवित आहेत. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमध्ये जी अस्वस्थता निर्माण होते. तोच प्रकार फेसबुक व इन्टाग्रामसारख्या तंत्रज्ञानाने घडवून आणला. ‘टेक्नॉलाजी अॅडिक्शन’मधून बालक, युवक व युवतींच्या व्यक्तिमत्त्वाला उद्ध्वस्त करणाºया घटना पुन्हा वाढतील, असा धोका समुपदेशकही व्यक्त करीत आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे स्मार्ट फोनद्वारे माहितीचा खजिना उपलब्ध झाला, हे खरे आहे. मात्र ज्ञान व माहितीपेक्षा गेमिंग, गॅम्बलिंग आणि पोर्नोग्राफीला बळी पडण्याचे प्रकार १६ ते २५ वर्षे वयोगटातील युवक- युवतींमध्ये घडत आहेत. या घटना अमली पदार्थापेक्षाही घातक असून पालक आणि समाजातील सजक घटकांनी वेळीच जागृत झाले नाही, तर तरुणाईचे आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते. पालक व कुटुंब प्रमुखांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
कुटुंब संस्थेला भगदाड!
बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंब संस्थेवर प्रचंड आघात होत आहेत. अशा अस्वस्थ वर्तमानात सुसंवाद कायम ठेवायचा असेल तर पालक व पाल्यांमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीविषयी साधक-बाधक माहितीची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे. चंद्रपूर शहरातील मध्यवर्गीय नवश्रीमंत कुटुंबाला चंगळवादाची लागण झाली. धावपळीच्या जीवनात मुलामुलींचे भावविश्व समजून घेण्याची उसंत नसल्याने हातात हजारो रुपयांचे स्मार्ट मोबाईल देवून मोकळे होणारे पालक वाढत आहेत. परिणामी, संवादाची दरी निर्माण झाली. कुटुंब संस्थेला भगदाड पडू लागले. पंख फुटलेली तरुणाई कुटुंबाला जुमानत नाही. हरवलेले नातेसंबंध स्मार्ट फोनमध्ये शोधू लागली. यातून अनर्थ ओढवू शकते.
अमली पदार्थांपेक्षाही घातक
नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्युरोसायन्सेस या संस्थेने देशभरातील दोन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाºया महानगरांच्या सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात ५ कोटी तरुणाई टेक्नॉलाजी व्यसनाधिनतेच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाले. देशभरात १ कोटी १० लाख व्यक्ती अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचा केंद्र शासनाचा अहवाल सांगतो. याचा अर्थ अमली पदार्र्थांपेक्षाही स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या व्यसनात अडकलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मोबाईल टेक्नॉलाजी
फायदे : जगातील कुठल्याही कोपऱ्यातून क्षणात संपर्क, कमी पैशात उपलब्ध, माहितीचा अफाट खजिना. बोटांवर मनोरंजन
तोटे: वेडेपणा ठरेल असा छंद, बिघडत जाणारी लाईफस्टाइल, बैठे जीवन, निद्रनाश, भ्रामक गोष्टींवर प्रेम, जीवन, कुटुंबव्यवस्थेत दुरावा निर्माण होण्याचा धोका, सुख-दु:ख वाटून घेण्याच्या भावनेचा अभाव, वर्तवणुकीत धोकादायक बदल.
सायबर गुन्हे वाढले
स्मार्ट टेक्नॉलॉजी वाईट नाही. मात्र, याचा वापर करण्याविषयी जागृतीचा प्रचंड अभाव असल्याने युवक-युवती चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतली. व्हॉटस्अॅप सारख्या साधनांमुळे पती-पत्नींमध्ये वितुष्ट वाढले. बालक, मुली-मुले मोबाईल गेमच्या नादी लागली. टेक्नॉलॉजीचे अनिवार्यता आणि दुष्पपरिणाम न समजल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. डिप्रेशन, मनोविकाराची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असले, तरी तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. याशिवाय बºयाचदा पोलीस तपासातही त्रुटी ठेवली जातात. आर्थिक गुन्ह्यांमध्ये हे प्रकार घडत आहेत. त्यासाठी सर्वच घटकांत वैचारिक प्रगल्भता हाच पर्याय आहे.
-अॅड. अभय कुल्लरवार, विधी तज्ज्ञ
मुलांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हवेत पालक
मोबाईलचा अतिवापर केल्याने झोप न येणे, चिडचिडेपणा, अभ्यासाकडे दुर्लक्ष, एकलकोंडेपणा आदी समस्या घेऊन पाल्यांवर उपचारासाठी येणाºया पालकांची संख्या वाढत आहे. स्मॉर्ट टेक्नॉलॉजीचे विघातक परिणाम दिवसेंदिवस वाढू लागलेत. खरे तर पालकांमुळे मुले मोबाईलच्या संपर्कात येतात. शांत ठेवणे अथवा आपला वेळ वाचविण्यासाठी मुलांना मोबाईल देण्याचा प्रकार पूर्णत: चुकीचा आहे. मोबाइलच्या वेगवेगळ्या फीचर्समुळे मुले आकर्षित होतात. त्यातूनच व्यसन लागते. त्यामुळे मोबाईलचा वापर किती वेळ करायचा, यावर बंधन घातले पाहिजे. एकांतात वापरण्यासाठी मोबाईल करू देऊ नये. जेवण व झोपताना मोबाईल दूर ठेवावा. मुलांच्या सोशल साईट्सवर पालकांनीही सहभाग घ्यावा. मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.
- डॉ. विवेक बांबोळे, मानसोपचार तज्ज्ञ