पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकजागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 12:39 AM2017-05-04T00:39:45+5:302017-05-04T00:39:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सुधीर मुनगंटीवार : मूल येथे पाणी आणि स्वच्छता पार्कचा लोकार्पण सोहळा
मूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वांना शुध्द पाणी मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाकरिता कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना आवश्यक असून शोष खडडे करून सांडपाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून या संदभार्तील मोहीम अधिक गतीमान होईल व त्या माध्यमातून लोकजागरण होत, या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होईल, असा विश्वास राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा पंचायत समिती मूलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पाणी आणि स्वच्छता पार्कच्या लोकार्पण सोहळयात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, शितल बांबोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अशोक सिरसे, गटविकास अधिकारी प्रदिप पांढरबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मूल शहरात उभारण्यात आलेल्या या पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागरण होतानाच पाण्याची साठवण आणि पाण्याचा वापर तसेच नियोजन याबाबत सुध्दा लोकजागरण होणार आहे. नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला व शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी बोलताना केले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी पार्कची पाहणी केली. नांदेड पॅर्टन सोप पिट बॉयोगॅस टॉयलेट, घरगुती बाथरूम ओटा अशा विविध वैशिष्यपूर्ण मॉडेल्सच्या माध्यमातून या पार्कमध्ये स्वच्छतेविषयी संदेश देण्यात आले आहे. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)