चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवार जनता संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 08:39 PM2020-09-07T20:39:56+5:302020-09-07T20:40:18+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवारपर्यंत जनता संचारबंदीचे लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवारपर्यंत जनता संचारबंदीचे लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक पार पडली.
सर्व रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, बँका, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडिसी मधील सर्व आस्थापना सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहतील. सर्व किराणा, भाजी, फळे दुकाने, पान ठेले, चहा टपऱ्या, फुटपाथवरील दुकाने बंद ठेवण्यात येतील. नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी केले.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच सर्व पक्षाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जनता कर्फ्यू संदर्भात उपस्थित संघटनेतील जाणकारांची मते जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली. कोरोना संसगार्चा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्यामुळे बाधित पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या तसेच ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यावर प्रशासनामार्फत भर देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात पूर्णत: लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास यश मिळेल त्यासोबतच जनतेने मास्क, सॅनीटायजर, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, स्वत:ची सावधगिरी बाळगावी,प्रशासनाचे सहकार्य करावे,असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.
जनता कर्फ्यसाठी जनतेचे सहकार्य अतिशय आवश्यक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. त्यामुळे बाधित पुढे येत असून जनतेने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पॉज बटन दाबणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात जनता कर्फ्यू करण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले.