जनता कर्फ्यूमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:20+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णत: बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली याचाच फायदा घेत ठोक विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ केली. त्यामुळे जनसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णत: बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळू लागली. त्यामुळे मोठ्या व्यापारी, ठोक विक्रेते यांनी तेल, आटा, साखर, तांदूळ, गहूच्या दारात एका किलोमागे पाच ते दहा रुपयापर्यंतची वाढ केली. परंतु, सात दिवस दुकाने बंद राहिल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ग्राहकही अतिरिक्त दर देऊन साहित्यांची खरेदी करीत आहेत.
भाजीपाला वधारला
जनता कर्फ्यूची घोषणा होताच बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा ३० रुपये किलोवरुन ६० रुपये किलो, टमाटर ५०, आलू ५०, फुलकोबी १००, वांगे ३० रुपये प्रति किलो विक्रीला होता. प्रत्येक किलोमागे किमान १० ते ३० रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र सात दिवस बाजारपेठ बंद राहत असल्याने नागरिकांना अडचण जात आहे.
मुबलक साठा असूनही वाढ
जिल्हाबाह्य तसेच आंतरजिल्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच ट्रांसपोर्टींग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे किराणा वस्तू, भाजीपाला, दैनदिन वापराच्या वस्तूंची आयात निर्यात सुरळीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सर्व वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र तरीसुद्धा विक्रेते कृत्रिम टंचाई भासूवून अतिरिक्त दराने वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे.