लोकसेवा आणि विकास संस्थेचे पुरस्कार प्रदान
By admin | Published: January 23, 2015 12:35 AM2015-01-23T00:35:47+5:302015-01-23T00:35:47+5:30
दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील लोकसेवा आणि विकास संस्थेच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चंद्रपूर: दरवर्षी प्रमाणे यंदाही येथील लोकसेवा आणि विकास संस्थेच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, कस्तुरबा गांधी स्मृती पुरस्कार आमदार शोभाताई फडणवीस, वीर बाबूराव शेडमाके स्मृती पुरस्कार मोहन हिराबाई हिरालाल, माजी आमदार स्व. बाबूराव पोटदुखे स्मृती विशेष पुरस्कार माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा लोकसेवा आणि विकास संस्थेचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अरविंद सावकार पोरेड्डीवार, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, शफीक अहमद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. ए. शेख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. वसंत पुरके म्हणाले, या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. माझ्या राजकीय जडणघडीत शांताराम पोटदुखे यांचे योगदान मोठे आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही दुर्दैवी बाब असून शेतकऱ्यांशिवाय आपला विकास शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शोभाताई फडणवीस, अॅड. वामनराव चटप, मोहन हिराबाई हिरालाल यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे कार्य मोठे असून समाजासाठी त्याचे योगदान स्मरणात राहील असे, ना.हंसराज अहीर म्हणाले.
शांताराम पोटदुखे म्हणाले, चळवळीतील कार्यकर्ते भरभरुन पोटतिडकीने कसे बोलतात, हे बघितले. समाजातील चांगली माणसे अर्ज करणार नाहीत, अशी धारणा असल्याने संस्था कधीच पुरस्कारासाठी अर्ज मागवित नसल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. जे. ए.शेख, संचालन डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी तर आभार प्रा. स्वप्निल माधमशेट्टीवार यानी मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)