इंदिरानगर रोडवर तयार झाले पाण्याचे डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:46+5:302021-06-21T04:19:46+5:30
चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक तीनच्या हद्दीत येत असलेल्या कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभूमी इंदिरा नगर या ...
चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक तीनच्या हद्दीत येत असलेल्या कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभूमी इंदिरा नगर या रोडची दुरुवस्था झाली आहे. परिणामी दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे या रोडवरून मार्गक्रमण करताना मोठी अडचण जात आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी युवा आघाडीतर्फे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील स्मशानभूमीवर अंत्ययात्रेसाठी बंगाली कॅम्प, श्यामनगर, प्रगतीनगर, शंकरनगर, रय्यतवारी या भागातून लोक येत असतात. मात्र स्मशानभूमी लगत असलेल्या राजीव गांधी नगर येथील नागरिकांना आवागमन करण्यासाठी रस्ताच शिल्लक नाही. कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभूमी इंदिरा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून पायदळ जाणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीतर्फे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना बीआरएसपीचे महेंद्र झाडे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष राजू रामटेके, धम्मदीप बांबोळे, अमोल जुनघरे, ताजून सुखदेवे, प्रफुल्ल रामटेके, गिरीश बोंडे, जितेंद्र लाडे आदीं उपस्थित होते.