पळसगाव-आमडीचे सिंचन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:28 PM2018-04-21T23:28:34+5:302018-04-21T23:29:53+5:30

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.

Pulsasgaon-Amdi irrigation has stopped | पळसगाव-आमडीचे सिंचन थांबले

पळसगाव-आमडीचे सिंचन थांबले

Next
ठळक मुद्देबजेट ७०.३४ कोटींच्या घरात : बल्लारपूर तालुक्यातील मोठा प्रकल्प रखडला

सुरेश रंगारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. कळमना गावाशेजरी असलेल्या वर्धा नदीवर पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाला २००१ मध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. प्रत्यक्षात कामाची सुरूवात २००५ पासून झाली. परंतु कामात वेळोवेळी खंड पडल्याने या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आजवर पोहोचले नाही. प्रकल्प लांबला व प्रकल्पाचे बजेट १९ कोटींवरून ७०.३४ कोटीच्या घरात पोहचले. हा प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र नियोजनाअभावी प्रकल्प रखडला.
पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाच्या नियोजनाचे काम सन १९९९ मध्येच सुरू झाले. सन २००१ ला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. पण वनजमीन कायदा, भूसंपादन कायद्यामुळे यात खंड पडत गेला. विद्यमान पालकमंत्री व तेव्हाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून पळसगाव - आमडी उपसा सिंचनाचे काम सुरू झाले. यात अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनीही शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या प्रकल्पाला गती दिली. २००९ मध्ये पुन्हा या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली. यात ४.५ हेक्टर शेतजमीन व ११.५० हेक्टर वनजमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पामुळे २७०५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून बामणी, दुधोली, दहेली, जोगापूर, कोटी तकूम, कोर्टी मक्ता, आष्टी, कळमना, आमडी, पळसगाव या दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सुरूवातीला या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना कालव्याच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया होती. त्यानंतर त्यात बदल करून उर्ध्वनलिका सिंचन प्रकल्प आखण्यात आला. सध्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर जरी असले तरी शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी पोहचले नाही. ते केव्हा पोहोचणार याबाबत अधिकारी निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना शेतकºयांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृगजळ ठरत आहे.

पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून चालू आहे. या भागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा फायदा होईल, यात शंका नाही. परंतु या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात बदल करून कोठारी येथील शेतकºयांना लाभ व्हावा, यासाठी नियोजन करावे.
-मोरेश्वर लोहे
सरपंच ग्राम पंचायत कोठारी
अध्यक्ष सरपंच संघटना बल्लारपूर तालुका

पुरेशा पाण्याअभावी शेतकºयांच्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना दरवर्षी फटका सहन करावा लागतो. सध्या गावातील शेतकºयांकडे विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने पुरेसे पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांवर शासनाने उपकार करावे.
-शंकर खोब्रागडे
सरपंच, ग्रामपंचायत पळसगाव

प्रकल्प दहा वर्षापासून रखडला आहे. काम कासवगतीने सुरू आहे. प्र्रकल्पाचे पाणी शेती सिंचनासाठी लाभदायी असून त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. प्रकल्पाचे पाणी चालु वर्षात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तरच शेतकरी आनंदी होईल.
-सुनिल बावणे
सरपंच ग्रामपंचायत कळमना

या प्रकल्पामुळे पळसगाव आमडी या भागातील कृषी क्षेत्रात मोठा फरक पडणार असून शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.
-अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे

Web Title: Pulsasgaon-Amdi irrigation has stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.