गावांना पुरविणार ‘पल्स ऑक्झिमीटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:01:02+5:30

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. संस्थात्मक विलगीकरण कक्षांचा विस्तार करून त्यातील उणिवा दूर केल्या.

'Pulse oximeter' to be provided to villages | गावांना पुरविणार ‘पल्स ऑक्झिमीटर’

गावांना पुरविणार ‘पल्स ऑक्झिमीटर’

Next
ठळक मुद्देआरटीपीआर मशीन खरेदी करणार : कोरोनाविरूद्ध वाढविणार तपासण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात बुधवारी ३० रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११९५ झाली आहे. सध्या ३६८ बाधितांवर उपचार सुरू आहे. आजारातून बरे झाल्याने ८१५ जणांना सुटी देण्यात आली. मात्र, दररोज १५ ते २० रूग्ण वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधासाठी आता तपासण्यांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना लॅबमध्ये पुन्हा एक आरटीपीआर मशीन खरेदी केली जाणार असून सर्व गावांना ‘पल्स आॅक्झिमीटर’ पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. संस्थात्मक विलगीकरण कक्षांचा विस्तार करून त्यातील उणिवा दूर केल्या. परजिल्हा व परप्रांतातून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कक्षांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारपर्यंत रूग्णांची संख्या ११६५ झाली. आतापर्यंत ७७६ कोरोनामुक्त झाले. अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ३६८ अधिक झाली.
कोरोनामुळे जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुसज्ज प्रयोगशाळेत दररोज १ हजार ६०० स्कॅब तपासून वैद्यकीय अहवाल जाहीर केले जात आहे. यापुढे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत २० हजार १२९ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टिजेन आणि आरटीपीसीआरच्या २२ हजार ६६६ चाचण्यात करण्यात आल्या. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये ४२ हजार ८०५ पैकी ४० हजार ८६२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासण्यांची संख्या वाढविण्याकडे यापुढे जास्त लक्ष देण्यात येणार आहे.

‘पल्स ऑक्झिमीटर’ म्हणजे काय?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य पथकासोबत ग्रामपंचायती व स्थानिक समित्यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे गावपातळीवर चाचण्या करण्यासाठी ‘पल्स ऑक्झिमीटर’ पुरविण्यात आल्या. यापुढे १०० टक्के गावांना पुरविण्यात येणार आहे. याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशी संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेता येणार आहे. या तपासणीद्वरम्यान संबंधित व्यक्तीचा एसपीओटी ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा सर्वच व्यक्तींच्या चाचणीवर भर दिला जाणार आहे. चाचण्यांसाठी अत्यावश्यक वैद्यकीय साधनांची अजिबात कमतरता भासून दिला जाणार नाही. खासगी डॉक्टरांकडे कोविड १९ ची लक्षणे असणारी व्यक्ती आल्यास त्यांनी तात्काळ शासकीय रूग्णालयाकडे रेफर करावे. -अजय गुल्हाणे, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

तपासणीसाठी ३० हजार किट्स मागविणार
कोरोनाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात सध्या १५ हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट्स उपलब्ध आहेत. यापुढे चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ३० हजार किट्स मागविण्यात येणार आहे.

Web Title: 'Pulse oximeter' to be provided to villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.