पल्स पोलिओ मोहिमेला जनतेचे सहकार्य आवश्यक
By admin | Published: January 17, 2015 10:56 PM2015-01-17T22:56:57+5:302015-01-17T22:56:57+5:30
१८ जानेवारीला राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले आहे.
चंद्रपूर : १८ जानेवारीला राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत भारत देश संपूर्ण पोलिओ मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. भारत लवकरात लवकर पोलिओ मुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, असा उद्देश समोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या हेतूने भारत सरकार १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवित आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्वेक्षण व पोलिओ पल्स आढळल्यास मॉप-अप राऊंड याद्वारे पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. भारत देशात जानेवारी २०११ नंतर अद्यापर्यंत पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाची सुरूवात झाल्यापासून प्रथमच अशा पद्धतीने यश मिळालेले आहे.
जानेवारी २०१४ मध्ये भारत देशास पोलिओ निर्मूलन प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतु आजघडीला सन २०१४ मध्ये जगात आढळलेल्या एकुण ३५० पोलिओ रुग्णापैकी २९७ पोलिओ रुग्ण आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान आढळले आहेत. तसेच काही देशात पोलिओ निर्मूलनानंतरही पोलिओ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे संपुर्ण जगातून पोलिओ निर्मूलन होईपर्यंत हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे.
यापुढेही भारतातून पोलिओ रुग्णाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता याावर्षी सुद्धा पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची पहिली फेरी रविवारी १८ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ लस पाजण्याचे आवाहन संध्या गुरनुले यांच्यासह उपाध्यक्ष कल्पना बोरकर, आरोग्य व अर्थ सभापती ईश्वर मेश्राम यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहीम चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)