बुलेट मिरवणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांवर थेट न्यायालयात खटला; ३५ वाहचालकांवर दंड
By परिमल डोहणे | Published: November 1, 2023 05:26 PM2023-11-01T17:26:37+5:302023-11-01T17:28:58+5:30
आरटीओ व वाहतूक शाखेची कारवाई
चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी ४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अठरा वर्षाखालील सहा अल्पवयीन बुलेट चालकांवर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला, तर विना परवाना, विना हेल्मेट ३५ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे दाबे दणाणले आहेत.
दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अल्पवयीन चालकाच्या हातातही सर्रास वाहने दिसून येत आहेत. परिणामी, अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक शाखेच्या वतीने अल्पवयीन वाहनचालक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली असून चौका-चौकात पथक गठित केले आहे. या पथकांकडून चालकांची तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी या पथकाने सहा अल्पवयीन बुलेटराजांवर कारवाई करत त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या नेतृत्वात आरटीओतील तसेच वाहतूक पोलिसांच्या पथकाने केली.
आरटीओने घेतला क्लास
मंगळवारी ४१ वाहनचालकांवर केलेल्या कारवाईत सहा अल्पवयीन वाहनचालकांचा समावेश आहे. त्यामुळे आरटीओने नियमांचे उल्लंघन केलेल्या सर्व चालकांना पालकांना बोलावून त्यांचा क्लास घेतला. यावेळी अल्पवयीन चालकांच्या हातात गाड्या देण्याचे दुष्परिणाम तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अपघाताची शक्यता याबाबत समुपदेशन केले.
स्टंटमॅन राहणार रडारवर
शहरातील अनेक भागात दुचाकी वाहनचालक मोठ्या प्रमाणात स्टंट करत असतात. परिणामी, त्यांच्यासह इतरांच्या जीविताला धोका असतो. त्यामुळे अशा स्टंटमॅनविरुद्धही या संयुक्त पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सायंकाळी तसेच रात्री हे पथक ग्रस्त घालून कारवाई करणार आहे.