...म्हणून केंद्र सरकारने केली कृषी कायदे रद्दची घोषणा : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:15 PM2021-11-19T17:15:27+5:302021-11-19T17:43:42+5:30
ऊन, वारा, पावसात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला सलाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.
चंद्रपूर : उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुकांना सामोरे जाताना तेथील शेतकरी व जनतेला उत्तर देण्यासाठी काहीही नव्हते. ही अडचण लक्षात घेऊनच कोणालाही विचारात न घेता लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केंद्र सरकारला करावी लागली. ऊन, वारा, पावसात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला सलाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना मिळावी, कृषी मालाला योग्य भाव मिळावा, जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने कृषी कायद्यात सुधारणेचा विचार २०१४ पूर्वीच्या सरकारचा होता. कृषी हा राज्याशी संबंधित विषय आहे. तेव्हा राज्य सरकारे, कृषितज्ज्ञ, कृषी विद्यापीठे, कृषी संघटना आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून या सुधारणा करण्याचे काम सुरू होते. नंतर केंद्रातील सरकार बदलले. मात्र या सरकारने काही तासांतच तीन कृषी कायदे लागू केले. हे कायदे करताना सखोल चर्चा झाली नाही. परिणामी कृषी क्षेत्रात नवीन समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात येताच देशाच्या विविध भागात या कायद्याला विरोध सुरू झाला, या शब्दात शरद पवार यांनी कायद्याचे अपयश सांगितले.
कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्लीला जाणारा मार्ग रोखून धरावा लागला. हा संघर्ष शांततेच्या मार्गाने उन्ह, वारा, पावसाची तमा न बाळगता सुरूच ठेवला. या शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची गरज होती. मात्र केंद्र सरकारने आश्चर्यकारक भूमिका घेतली. या आंदोलनात राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबचे शेतकरी उतरले. पुढे होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब राज्याच्या निवडणुकांना सामाेरे कसे जायचे हा प्रश्न केंद्र सरकारला पडला. म्हणून हे कायदे मागे घ्यावे लागले, अशी टीकाही पवार यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल, ना. प्राजक्त तनपुरे, ओबीसी नेते डाॅ. अशोक जिवतोडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सुबोध मोहिते उपस्थित होते.
सन्मान दूरच, सौजन्याची वागणूकही नाही
महाराष्ट्रासारखे मोठे राज्य भाजपच्या हातात नाही. याचा परिणाम राज्यातील नेतृत्वावर झाला आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भविष्यवाणी करीत होते. अशातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने यशस्वीरीत्या दोन वर्षे पूर्ण केली. आता सत्तेचा दुरुपयोग करून चौकशा, ईडीचा वापर केला जात आहे. खोट्यानाट्या केसेस लावल्या जात आहे. तिन्ही पक्ष एकत्र असल्याने याचा परिणाम होणार नाही. पं. बंगालमध्ये सर्व प्रयत्न केले तरीही सत्ता आली नाही. केरळ व महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदींकडून विरोधकांचा सन्मान दूरच, पण विरोधकांना साधी सौजन्याची वागणूकही मिळत नसल्याचा गंभीर आरोप या वेळी शरद पवार यांनी केली.