५० वर्षांनंतर मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:31 PM2018-10-09T22:31:39+5:302018-10-09T22:31:57+5:30
१९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : १९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत नवानगर समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पुनर्वसन काळात ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले आहे. परिणामी गावातील पाण्याचे स्रोत्र फ्लोराईडयुक्त आहेत. त्यामुळे गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे.
प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी कळू लागले तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी मागणी ते करू लागले. २००५ पासून ते या मागणीचा पाठपुरावा करीत होते. पण या मागणीची एकाही लोकप्रतिनिधीने व अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा गांभीर्याने विचार केला नाही. दरम्यान या भागाचे जि. प. सदस्य संजय गजपुरे यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा ही मागणी रेटून धरली. आणि अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम लावण्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनाही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे.
‘लोकमत’ने वेधले लक्ष
नवानगर या पूनर्वसन गावाच्या पाण्याच्या समस्येकडे लोकमतने अनेकदा वृृत्त प्रकाशीत करुन लक्ष वेधले होते. त्यामुळे आरोग्य यंत्राणा खळबळू जागी झाली. दरम्यान गावात वॉटर एटीएम मंजूर होऊन त्यांचे काम सुरु झाल्याने गावकºयांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.