आठ हजार १३६ रुपये असलेली ती पर्स कोणाची? वाहकाचा प्रामाणिकपणा, पर्स आगारामध्ये केलीजमा
By साईनाथ कुचनकार | Published: August 31, 2023 04:36 PM2023-08-31T16:36:24+5:302023-08-31T16:37:42+5:30
पर्समध्ये कागदपत्र नसल्याने ओळख पटलीच नाही
चंद्रपूर : चंद्रपूर येथून गडचांदूर येथे जात असलेल्या एसटीतील एका सीटवर तब्बल आठ हजार १३६ रुपये असलेली एक पर्स वाहकाला दिसली. कुणीतरी महिला ती विसरून गेली. मात्र या पर्समध्ये ओळखपत्र किंवा कोणतीही कागदपत्रे नसल्याने ती पर्स नेमकी कोणाची, हा प्रश्न वाहकाला पडला. वाहकाने प्रामाणिकपणा दाखवित ती पर्स राजुरा आगारामध्ये जमा केली.
रवींद्र पिसे असे राजुरा आगारातील प्रामाणिक वाहकाचे नाव आहे. दरम्यान राजुरा आगाराने महिलेचा शोध सुरू केला आहे. हल्ली कुणाचे पाच रुपये जरी दिसले तर ते खिशात टाकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र यातही काही जण प्रामाणिकपणा दाखवून संबंधितांचे नुकसान नको, म्हणून असले प्रकार टाळतात आणि ज्यांचे कोणाचे पैसे, वस्तू असेल त्यांना देण्यासाठी त्यांची सारखी धडपड असते. अशीच धडपड सध्या चंद्रपूर येथील रहिवासी असलेले आणि राजुरा आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत असलेले रवींद्र पिसे यांची दिसून येत आहे.
राजुरा आगाराची एसटी क्रमांक एमएच ४० एन ८६०२ ही चंद्रपूर येथून मंगळवारी दुपारी ३:४५ वाजता गडचांदूरकडे निघाली. वाहन म्हणून रवींद्र पिसे कामगिरीवर होते. दरम्यान, गडचांदूर येथे ५:१५ वाजताच्या सुमारास ही बस पोहोचली. तेव्हा वाहन पिसे यांना एसटीच्या एका सीटवर एक पर्स आढळून आली. त्यांनी प्रवाशांना विचारणा केली. मात्र कुणीही समोर आले नाही.
दरम्यान, त्यांनी पर्स उघडून बघितली असता त्यामध्ये पर्समध्ये ८ हजार १३६ रुपये असल्याचे त्यांना दिसून आले. मात्र पर्समध्ये ओळखपत्रासंदर्भात एकही कागदपत्र नव्हते. यामुळे वाहकाची घालमेल अधिकच वाढली. त्यांनी थेट राजुरा आगारात येऊन ही बस आगारप्रमुखांकडे सुपूर्द केली. वाहक पिसे यांच्या प्रामाणिकपणामुळे आगारप्रमुखांनीही त्यांचे कौतुक केले. दरम्यान, ज्या कुणाची ही पर्स असेल त्यांनी राजुरा येथील आगारात संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले.