धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्यापूर्वी खड्डे बुजवा
By admin | Published: October 6, 2015 01:21 AM2015-10-06T01:21:54+5:302015-10-06T01:21:54+5:30
वरोरा नाका चौक ते दीक्षाभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या
चंद्रपूर : वरोरा नाका चौक ते दीक्षाभूमीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येत्या १४ आॅक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मचक्र अनुवर्तन दिनाचा समारंभ येथील दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. खड्डयामुळे लाखो आंबेडकरी अनुयायांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. १४ आॅक्टोबरपूर्वी या रस्त्यावरील खड्डयांची तातडीने डागडुजी करावी. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशिकांत देशकर यांनी दिला. यासंदर्भातील निवेदन शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
देशकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकातील काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. पूर्वीच्या कामाचे डिझाईन चुकले. नविन उड्डाण पुलाचीही तिच स्थिती झाली. अर्धेअधीक काम झाल्यानंतर डिझाईन चुकल्याच्या नावाखाली बांधकाम विभागाने काम बंद केले. शिवाय रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी जवळपास ५० लोकांना वरोरा नाका चौकात जीव गमवावा लागला. आणखी किती लोकांचा जीव गेल्यानंतर कामाला प्रारंभ करणार आहात, असा सवाल देशकर यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी कार्यकारी अभियंत्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत पुल सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कामाला प्रारंभ झाला नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आंबेडकर महाविद्यालयासमोरील मित्रनगर चौकापर्यंतच्या रस्त्यांची कामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तेही हवेतच विरले.
आता धम्मचक्र अनुवर्तन दिन लवकरच सुरू होणार आहे. मात्र काम सुरू झाले नाही. चार दिवसांत या मार्गावरील खड्डे बुजवावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देशकर यांनी दिला. निवेदन देताना नगरसेवक संजय वैद्य, सुनिल काळे, महेंद्र लोखंडे, राजेंद्र नागरकर, मुन्ना भाई, शबीरभाई, राजेंद्र माकोडे, नयन महातव, प्रशांत चिप्पावार, प्रतिक भगत, विजय नागापुरे, सुनिल धोत्रे, मुन्ना तावाडे, प्रियदर्शन इंगळे, राजेंद्र आखरे, निमेश मानकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)