कालव्याच्या कामामुळे पाईललाईन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:03 AM2019-04-29T00:03:29+5:302019-04-29T00:04:14+5:30
मूल तालुक्यातील चिचाळा व परिसरातील आठ गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून २४ कोटी रुपये खर्च करुन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या वतीने असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतील पाणी देण्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यातील चिचाळा व परिसरातील आठ गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून २४ कोटी रुपये खर्च करुन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या वतीने असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतील पाणी देण्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार असली तरी या कामांमुळे पाणी पुरवठयाची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत चालविल्या जाणाºया बोरचांदली योजनेतील पाच गावांचा पाणी पुरवठा ठप्प पडला आहे. महिलांना पाण्यासाठी विनाकारण भटकंती करावी लागत आहे.
उन्हाळ्यात पाणी समस्या भेडसावू नये म्हणून जि.प.चे अधिकारी प्रयत्नरत आहेत. मात्र दोन्ही विभागाच्या अधिकाºयात योग्य समन्वय नसल्याने पाईप फुटण्याचे प्रमाण वाढतच आहे. परिणामी महिलांसाठी पाणी समस्या उग्ररुप धारण करीत आहे.
जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत मूल तालुक्यात तीन योजना कार्यान्वित आहेत. बोरचांदली योजनेंतर्गत १५ गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र भूमिगत पाईपलाईनच्या कामामुळे पाईपलाईन फुटत असल्याने चिचाळा, ताडाळा, हळदी, दहेगाव, मानकापूर आदी गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
ऐन उन्हाळ्यात अशी स्थिती उद्भवल्याने नागरिक त्रस्त आहेत. संबधित गावातील पाणी समस्या लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कंत्राटदार व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम पुर्णत्वास न्यावे व पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाचही गावातील महिलांनी केली आहे.
हातपंपही नादुरुस्त
उन्हाळ्याचे दिवस सुरु असून पाण्यासाठी महिला वणवण भटकंती करीत आहेत. संबधित गावात विहीर व बोअरवेलची संख्या तोकडी आहे. तर काहींचे पाणी पिण्यासारखे नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.