पाणवठे बांधून जनावरांची तहान भागवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:15+5:302021-05-17T04:26:15+5:30
चंद्रपूर : चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भ पुन्हा एकदा प्रचंड तापू लागला आहे. उष्णतेची लाट आली असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. ...
चंद्रपूर : चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भ पुन्हा एकदा प्रचंड तापू लागला आहे. उष्णतेची लाट आली असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. मानवाच्या अंगाची लाही-लाही होत आहे. मुक्या व भटक्या प्राण्यांचेही मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्था असलेल्या आपल्या शेताच्या परिसरात तसेच प्रशासकीय यंत्रणांनी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात पाणवठ्यांची व्यवस्था करावी, असे आवाहन डाॅ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले.
उन्हाचे दिवस लक्षात घेता, पाणवठे बांधण्यासाठी ते जनजागृती करीत आहे. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच पांडुरंग खरवडे, नानाजी बोधले, पंढरी नांदे, सचिन झाडे, गजानन पिंपळकर, रोशन दुडुरे, वामन पिंपळकर, सचिन पारखी, विजय नांदे, राहुल ठेंगणे, सुधाकर नांदे, शैनेश्वर पचारे, अनिल बोढले, गजानन भगत आदी उपस्थित होते.
सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाहेर निघत नाहीत. मात्र जनावरांचे सध्या मोठे हाल होत आहेत. त्यांना मुबलक चारा व स्वच्छ पाणी मिळत नाही. या दिवसामध्ये बिगर चारा-पाण्याने जनावरे अशक्त होतात. त्यांचा जीव कासावीस होतो. अशा जनावरांना मारू नका, त्यांना त्रास देऊ नका. ज्या पद्धतीने मानवांकरिता सामाजिक संस्थांकडून पाणपोई लावली जाते, त्याचपद्धतीने जनावरांसाठी ठिकठिकाणी पाणवठे लावल्यास या दिवसात त्यांना मुबलक पाणी मिळेल, पर्यायाने त्यांचा जीव वाचेल, असेही डाॅ. मैंदळकर यांनी आवाहन केले.
मुक्या व भटक्या प्राण्यांकरिता पाणवठे बांधून बघा, तो आत्मिक आनंद पैशानेही विकत घेता येणार नाही. या आनंदातून वेगळेच मिळेल. या ईश्वरीय कार्यात प्रत्येकाने समोर यावे, असेही ते म्हणाले.