सर्वांचा प्रश्न, कधी लावणार यादी?
By admin | Published: January 28, 2017 12:51 AM2017-01-28T00:51:31+5:302017-01-28T00:51:31+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप यादीचा घोळ संपलेला नाही.
आघाडीचा चेंडू मुंबईच्या कोर्टात : भाजपाची सावध भूमिका, शिवसेना उत्साहात
चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप यादीचा घोळ संपलेला नाही. २४ किंवा २५ जानेवारीला यादी जाहीर करू, असे सांगत नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरविला असला तरी, अद्याप कुण्याही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यामुळे इच्छुक उमेदवार दबावात तर, पुढारी राजकारणात गुंतले असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.
जिल्ह्यात वाढत असलेले भाजपाचे प्रस्थ लक्षात घेता सर्वच पक्षांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिकीट न मिळालेल्या नाराजांना बंडखोरीसाठी अधिक वेळ मिळू नये आणि त्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मागील काही वर्षांपासून अगदी वेळेवर उमेदवार जाहीर करण्याची पद्धत पक्षांनी अवलंबिली आहे. त्याची री या वेळी जवळपास सर्वच पक्षांनी ओढलेली दिसत आहे. भाजपाची तयारी आधीपासून असली तरी उमेदवार कोण असतील याची घोषणा झालेली नाही. देवराव भोंगळे, संध्या गुरनुले या दोघांचा अपवाद वगळता तिसऱ्या नावाची घोषणा पक्षाने केली नसल्याने इच्छुक उमेदवार दबावात आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची चिन्हे असली तरी निर्णयाचा चेंडू मुंबईच्या कोर्टात अडला आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार मुंबईला गेले होते. युतीचा प्रस्ताव देण्यासाबतच जागांचा प्रस्ताव त्यांनी पक्षनेते अजीत पवार यांच्याकडे दिला आहे. दुसरीकडे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन यादी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने आधी प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागा मागितल्या होत्या. मात्र त्या मागणीला स्थानिक स्तारवर विरोध झाल्याने राकॉकडून सर्व मिळून १४ जागांची मागणी मागणी पुढे आली. अगदी अलिकडच्या घटनाक्रमात हा आकडा आता १२ वर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी १२ जागा कोणत्या सोडायच्या, यावर पक्षात खल सुरू आहे. काँग्रेसमध्ये असणारी नेत्यांची चढाओढही या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यावर पर्याय म्हणून स्थानिक विधानसभा मतदार संघात वजन असलेल्या नेत्यांकडे जागावाटपाटपाचा अधिकार सोपविण्याच्या विचारात नेतेमंडळीचे एकमत झाल्याची माहिती आहे. असे असले तरी अद्याप अंतीम निर्णय न झाल्याने विलंब वाढला आहे.
अधिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील अंतीम चर्चेनंतरच आघाडीतील जागांचा निर्णय होणार आहे. शुक्रवारी मुंबईत दिवसभर काँग्रेसची बैठक झाली. मात्र नागपूर महानगर पालिकेच्या विषयावरच चर्चा अधिक लांबल्याने चंद्रपूरच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.
शिवसेनेने स्वबळावर लढण्याची आपली भूमिका आधीच जाहीर केली होती. असे असले तरी ठाणे-मुंबईतील निर्णयाकडेही स्थानिक नेत्यांचे लक्ष होते. वरच्या पातळीवर युती तुटल्याने आता स्थानिक नेतेमंडळी निर्णयासाठी मोकळी झाली आहे. असे असले तरी, जिल्हा परिषदेच्या सर्वच जागांवर एकाचवेळी उमेदवार देताना बराच ताण पडत असल्याने पक्षात विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्याही निवडणुका असल्याने उमेदवारांचा चेहरा ठरविताना सर्वच पक्षात बराच विचार होत असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)