१२०० ऑटोचालकांच्या मदतीचा प्रश्न कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:48+5:302021-04-30T04:36:48+5:30
बल्लारपूर शहरात ग्रामीण व शहरी मिळून १२०० च्या जवळपास ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ...
बल्लारपूर शहरात ग्रामीण व शहरी मिळून १२०० च्या जवळपास ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय आहे. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षा चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या खात्यावर मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीड हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. परंतु अजूनही पैसे जमा झाले नसल्याचे ऑटोचालकांनी सांगितले.
शहरात रेल्वे स्थानक, बसस्थानक, रेल्वे चौक, जुने बस स्टॅन्ड, वस्ती विभाग इत्यादी ठिकाणी ऑटोरिक्षा स्टॅन्डच्या माध्यमातून ऑटोरिक्षा चालक आपला व्यवसाय करतात. रेल्वे स्थानकावर मागील ४० वर्षांपासून ३० ऑटोचालकांचा उदरनिर्वाह रेल्वे प्रवाशांच्या भरवशावर असल्याचे महाराष्ट्र ऑटोचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अब्बास भाई यांनी सांगितले. मागील एक वर्षापासून कोरोना संकट आले आणि आमचा व्यवसाय डबघाईस आला. रेल्वे प्रवाशांचे रेल्वेने येणे कमी झाले. दिवसातून फार कमी यात्री येतात. त्यामुळे आमची रोजी निघत नाही. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे धंदा होत नाही. बाहेरचा प्रवासी मिळाला तर रोजी निघते. परंतु तीही मिळत नाही. आमची रोजी सर्वसाधारण रेल्वे प्रवाशावर आहे. कारण मोठे प्रवासी स्वतःची कार घेऊन येतात. त्यामुळे परिवाराचे पोट कसे भरावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.