तुरीच्या हमीभावाचा प्रश्न मुख्य सचिवांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:19 PM2019-01-13T22:19:39+5:302019-01-13T22:20:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आले असून त्यांनी ती विकायलासुध्दा सुरुवात केली आहे. परंतु चंद्रपूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आले असून त्यांनी ती विकायलासुध्दा सुरुवात केली आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. म्हणून नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपली तूर केंद्र सरकारने दिलेल्या हमीभावापेक्षा १२०० ते १५०० रूपये कमी भावाने विकावी लागत आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात नाफेडचे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते निलेश राठोड यांनी केली आहे. ही मागणी प्रशासनाने शासनापर्यंत योग्यरित्या मांडली नसून प्रशासन राठोड यांचे आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने दबावतंत्र वापरत आहे. या सर्व बाबींची कल्पना श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांना मोबाईलद्वारे दिली असता जैन यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर या प्रकरणाचा निपटारा करण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती अॅड. गोस्वामी यांनी दिली.
श्रमिक एल्गारच्या संस्थापिका व अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी नुकतीच निलेश राठोड यांच्या उपोषण मंडपाला भेट देवून त्यांच्या आंदोलनाला आपल्या संघटनेचा पाठिंंबा दर्शविला. यावेळी त्या म्हणाल्या, मोदी सरकारने तुरीला पाच हजार ६७५ रूपये हमीभाव जाहीर केला असून राज्य सरकारने अद्यापही नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केलेले नसल्यामुळे शेतकºयांना आपली तूर अत्यंत कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे.
पोलीस शिपाई हटवला
निलेश राठोड हे मागील १८ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहे. पोलीस प्रशासनाने मागील पाच दिवसांपासून तिथे तैनात असलेल्या पोलीस शिपायाला हटविले आहे. निलेश राठोड यांची वैद्यकीय तपासणीसुध्दा झालेली नाही. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या या भूमिकेवर शेतकºयांनी रोष व्यक्त केला आहे.