सिंचनाअभावी रबी हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:36 PM2017-12-23T23:36:10+5:302017-12-23T23:36:22+5:30
यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. मात्र यावेळी सिंचनसाठ्यात व बोडी-तलावातही पाहिजे तसे पाणी नसल्याने रबी हंगामही धोक्यात असून शेतकरीही चिंताग्रस्त दिसत आहेत.
यावर्षी खरिप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. कापसाला तर बोंडअळीने खाऊन टाकले. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही मावा, तुडतुडा या रोगांनी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटले आहे.
खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तरी रबी हंगामात काही प्रमाणात नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली आहे. मात्र त्यांच्यासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी-तलाव, बोड्या यामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.