मनपाच्या भर सभेत सत्ताधारी व काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:30 AM2021-07-30T04:30:38+5:302021-07-30T04:30:38+5:30

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाच्या राणी हिराई सभागृहात गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या ...

Rada between ruling party and Congress corporators in the entire meeting of the corporation | मनपाच्या भर सभेत सत्ताधारी व काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा

मनपाच्या भर सभेत सत्ताधारी व काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा

Next

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाच्या राणी हिराई सभागृहात गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत २३ जून २०२१ झालेल्या ऑनलाईन सभेचे कार्यवृत्त वाचून मंजूर करणे, ६ मे व ३१ मे २०२१ रोजी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या कार्यवृत्ताची माहिती देणे आणि मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक कोविडने मृत्यू झाल्याने त्या कुटुंबाला सानुग्रह मदत देण्याच्या विषयावर चर्चा केली जाणार होती. दुपारी १ वाजता राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली. यावेळी राणी हिराई सभागृहात महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. कोविड प्रतिबंधामुळे काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकूलकर, नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढीया, अमजद अली, संगीता भोयर, नीलेश खोब्रागडे, सकीना अंसारी, वनिता खनके, अशोक नागापुरे यांनी ऑनलाईन सभेत सहभाग घेतला होता.

बॉक्स

सभागृहात नेमके काय घडले?

ऑनलाईन सभेला सुरुवात होताच मनसेचे नगरसेवक सचिन भोयर व समर्थकांनी अमृत पाणीपुरवठा योजनेवरून मनपाविरूद्ध घोषणाबाजी करीत थेट सभागृहातच प्रवेश केला. हा प्रकार ऑनलाईन दिसताच संतापलेले काँग्रेसचे नगरसेवक बॅनर घेऊन सभागृहात गेले. ऑनलाईन सभेच्या नावाखाली बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप करून धारेवर धरले. यावरून विरोधक व पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी टेबलावर थाप मारताच महापौर राखी कंचर्लावार यांनी त्यांच्याच नावाची नेमप्लेट भिरकावली तर स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी हे आसनावरून खाली उतरून नागरकर यांच्यावर अंगावर धावून गेले व अश्लील शिवीगाळ केली. दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, नगरसेवक सुरेश पचारे यांनी आसवानी यांना पकडून शांत करण्याचा प्रयत्न केला तर आयुक्त हात जोडून विनंती केल्यानंतर महापौर व स्थायी सभापती आपापल्या कक्षात निघून गेल्याची चित्रफित समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे.

सत्ताधारी म्हणतात...

मागण्यांचे निवेदन महापौरांना न देता काँग्रेसच्या नगरसेवकांनी ऑनलाईन सभेत सभागृहात येऊन गोंधळ घातला. महापौर राखी कंचर्लावार यासुद्धा संयमाने प्रश्न मांडा, असे सांगत होत्या. मात्र, काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौरांच्या टेबलावर थाप मारली. हा प्रकार पाहून त्यांना समजाविण्यासाठी मी आसनावरून खाली उतरलो. कुणालाही धक्काबुक्की केली नाही. सभागृहात प्रश्न मांडण्याचा अधिकार आम्ही नाकारला नाही, असा दावा स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांनी केला.

विरोधक म्हणतात...

कोविड प्रतिबंधामुळे ऑनलाईन सभेत काँग्रेसचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. ही सभा आटोपल्यानंतर आयुक्त व महापौरांना महत्त्वाच्या तीन मागण्यांचे निवेदन सादर करणार होतो. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मनपा दोषींनाच अभय देत आहे. कोविडच्या नावाखाली चर्चा टाळून मनमानी ठराव पारित करून घेत आहे. याला विरोध म्हणून सभागृहात प्रवेश करून प्रश्न विचारला. मात्र ,महापौर व स्थायी सभापतींनीच वाटेल ते बोलून सभागृहात राडा केला, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया व नंदू नागरकर यांनी केला आहे.

नंदू नागरकर यांची पोलिसात तक्रार

महापौर राखी कंचर्लावार यांनी नेमप्लेट पेकून तर स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी हे आसनावरून खाली उतरून अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता शहर ठाण्यात केली.

Web Title: Rada between ruling party and Congress corporators in the entire meeting of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.