काँग्रेसच्या दोन गटांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:03 AM2017-09-24T00:03:34+5:302017-09-24T00:03:52+5:30

जिल्ह्यात काँग्रेसची गटबाजी लपून राहिली नसली तरी जेव्हाही पक्षस्तरावर एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा दोन गटांतील आपसी मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

Rada in two groups of Congress | काँग्रेसच्या दोन गटांमध्ये राडा

काँग्रेसच्या दोन गटांमध्ये राडा

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची संघटनात्मक निवडणूक बैठक : पुगलिया व वडेट्टीवार गट भिडले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेसची गटबाजी लपून राहिली नसली तरी जेव्हाही पक्षस्तरावर एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा दोन गटांतील आपसी मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. शनिवारी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीबाबत आयोजित बैठकीपूर्वी पुगलिया आणि वडेट्टीवार गट आमने-सामने झाले आणि राडा झाला. यामध्ये पक्ष निरीक्षकाची चांगलीच गोची झाली. हा प्रकार चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील इंटक कार्यालयाच्या सभागृहात दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.
दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्यामुळे तुंबळ हाणामारी झाली. अशातच कुणीतरी इंटक कार्यालयाच्या खिडकीच्या काचाही फोडण्याचा प्रकार केला. हा प्रकार सुमारे अर्धातास चालला. दरम्यान, पुगलिया गटाच्या कार्यकर्त्यांना वडेट्टीवार समर्थकांनी बाहेर काढले. यानंतर पक्षाचे निवडणूक निरीक्षक रामगोपाल भुवानिया यांनी बैठकीची पुढील प्रक्रिया पार पाडली. ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत चालली.
काँग्रेसच्या जिल्ह्यातील विविध पातळीवरील संघटनात्मक निवडणुकांसाठी शनिवारी निवड बैठक होणार असल्याची कल्पना आधीच पक्षकार्यकर्त्यांना होती. पक्ष निवडणूक निरीक्षक म्हणून रामगोपाल भुवानिया हे येणार होते. यानुसार ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी ही बैठक इंटक सभागृहात ११ वाजता आयोजित केली होती, तर याचवेळेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांचे समर्थक विश्रामगृहात बैठकीच्या अनुषंगाने एकत्र जमले होते.. भुवानिया हे विश्रामगृहात येऊन सदर कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारणार होते, असे पुगलिया गटातील कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र पक्ष निवडणूक निरीक्षक भुवानिया यांना गडचिरोलीहून चंद्रपूरला पोहचण्यास दुपारी ३ वाजले. यानंतर ते विश्रामगृहात न जाता सरळ इंटकच्या सभागृहात जाणार असल्याची माहिती मिळताच पुगलिया गटाचे कार्यकर्ते इंटक सभागृहात दाखल झाले. त्याचवेळी भुवानिया व आ. विजय वडेट्टीवार बैठकस्थळी पोहचले. यावेळी दोन्ही गटाकडून आपापल्या गटनेत्यांच्या नावाने जिंदाबादचे नारे सुरू झाले. यानंतर काही क्षणातच तणावाची स्थिती निर्माण झाली. आणि दोन्ही गट आमने-सामने आले.
दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन तुंबळ हाणामारीही झाली. यानंतर वडेट्टीवार समर्थकांनी पुगलिया गटाच्या कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले. नंतर काहीवेळातच आ. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरूवात झाली. बैठकीला उपस्थित पक्षाच्या विविध हुद्द्यावरील पदाधिकारी व नेत्यांनी पक्ष संघटनेबाबत आपापली मते मांडली. प्रत्येकांनी आपल्या मनोगतात पक्षातील अंतर्गत गटबाजीवर नाराजीचा सूर काढला.
बैठकीला माजी आमदार अविनाश वारजुकर, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदु नागरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, जि.प. गटनेता डॉ. सतीश वारजुकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, चंद्रपूर बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, सुनिता लोढीया, डॉ. रजनी हजारे, चंद्रपूर विधानसभा प्रमुख महेश मेंढे, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष शिवा राव, अब्दुल करीम, घनश्याम मुलचंदाणी, डॉ. आसावरी देवतळे, विजय देवतळे, विनोद दत्तात्रेय तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाचे कार्यालय त्यांनी बळकावून ठेवल्यामुळे इंटकच्या कार्यालयात ही बैठक घ्यावी लागली. गेस्ट हाऊसमध्ये ही प्रक्रिया पार पाडा, असा नरेश पुगलियांचा आग्रह होता. तुमच्या लोकांना येथे पाठवा, असे डीआरओचे म्हणणे होते. त्यांचा आग्रह गेस्ट हाऊसचाच होता. डीओरओ तेथे गेले नाही. शहरातील २५ कोटींंच्या संपत्तीचा वाद सुरू आहे. त्यांनी कब्जा आहे. एक कोटी २५ लाख किरायाही वसुल करीत आहे. ही संपत्ती वाचविण्यासाठी त्यांना शहराचा अध्यक्ष आपला करून घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी डीआरओवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी पाचपन्नास कार्यकर्त्यांना पाठवून प्रक्रिेयेत भाग न घेता गोंधळ घालण्यास सुरूवात केली. डीआरओंना म्हणाले की तुम्ही आमच्याबरोबर चला तिकडे नरेशबाबू वाट पहात आहे. तेव्हा नॉमिनेशनसाठी पक्ष निवडणूक निरीक्षकाकडे येतात. डीआरओ जात नाही, असे डीओरओचे म्हणणे होते. पुगलिया हे पक्षाचे नेते आहेत. या प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे मी जाणार, असेही डीआरओंनी सांगितले. मात्र त्यांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला. ते सातत्याने पक्षाच्या विरोधात काम करीत आलेले आहे. त्यांच्याकडे मेंबरशीप नसल्यामुळे त्यांनी या प्रक्रियेत भाग घेतला नाही. बल्लारपूर पेपरमीलचे मजूर आणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही हाणून पाडला.
- विजय वडेट्टीवार, आमदार

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार पक्षातंर्गत निवडणुकीपूर्वी क्रियाशील सदस्याची यादी प्रकाशित करावी लागते. त्यानंतर बुथ, गाव व तालुकास्तरावरील संघटनात्मक निवडणुका घेण्याची पद्धत आहे. पक्षाच्या पदाधिकारी होऊ इच्छिणाºयांना अर्ज भरून घेणे आवश्यक होते. तशी मात्र काहीच प्रक्रिया करण्यात आली. यामुळे शनिवारी निवडणूक निरीक्षक रामगोपाल भुवानिया यांच्या उपस्थित पार पडलेली प्रक्रिया घटनेला अनुसरून नाही. याबाबत केंद्रीय स्तरावर दाद मागण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षक भुवानिया यांनी आम्हाला भेटीसाठी सकाळी ११ वाजता विश्रामगृहात बोलावले होते. परंतू सरळ ते इंटक भवनात निघून गेले. त्यानंतर आमचे कार्यकर्ते इंटक भवनात गेले असता निरीक्षकांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
- सुरेश महाकुलकर, गटनेता, मनपा

Web Title: Rada in two groups of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.