टी-४९ वाघिणीच्या तीन मादी बछड्यांना रेडिओकॉलर आयडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:50 AM2019-03-05T11:50:49+5:302019-03-05T11:51:16+5:30
ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागात वाढत्या वाघांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्या स्थालांतरणाचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे.
ब्रह्मपुरी वनविभागातील ३ छाव्यांना रेडिओ कॉलरआयडी करण्यात आल्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागातील वाघांच्या हालचालीवर सनियंत्रण करण्यास मोठी मदत होणार आहे. या मोहिमेमुळे सदर परिसरात घटना घडल्यास त्या घटनेबाबत ठोस पुरावे मिळविण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होईल.
ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिवारात वास्तव्यास असलेल्या टी - ४९ वाघिणीच्या चार मादी बछड्यांपैकी ई - १ व ई - ४ ला दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी कोेरेगाव बिटातील कक्ष क्र. १५७ मध्ये खाडीमुंडा खोदतलाव परिसरात रेडिओ कॉलरआयडी लावण्यात आले आणि त्यांची योग्य तपासणी करून त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले आहे. दि. ०१ मार्च २०१८ रोजी चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. रामाराव यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी वनविभागातील टी - ४९ वाघिणीच्या कब ई - ३ ला त्याच परिसरात रेडीओ कॉलर आयडी लावण्यात आले. सदर मोहिमेत भारतीय वन्यजीव संस्था देहरादूनचे पशुचिकित्सक डॉ. पराग निगम, डॉ. बिलाल हबीब तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी चेतन पातोड यांच्या चमुने बेशुद्ध करून रेडिओ कॉलरआयडी लावली.
सदर मोहिमेत ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह, ब्रह्मपुरी वनविभाग प्रादे. व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वर बोंगाळे, दक्षिण ब्रह्मपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, उत्तर ब्रह्मपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राह्मणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता.
रेडीओ कॉलर आयडी लावलेल्या तीनही वाघीण तरूण आहे. त्यांचे जीवनमान अधिक आहे. मात्र त्यांच्याबद्दल अधिक माहिती वनविभागाकडे नाही. त्या कुठे जातात. त्यांचे भ्रमणमार्ग कोणते. त्यांचा एकूणच अभ्यास केला जाणार आहे. शिवाय या माध्यमातून ब्रह्मपुरी वनविभागात वाघांचे होणारे हल्ले याबाबीही लक्षात येणार आहे.
- व्ही. एस. रामाराव, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर